विश्वास पुरोहित

वय वर्ष २६… शिक्षण बीटेक इन एरोस्पेस… काम- सरपंच… बीड जिल्ह्यातील मंजरथ गावाची सरपंच ऋतुजा आनंदगावकरचा ही ओळख. चांगल्या पगाराची नोकरी असतानाही गावात बदल घडवायचा असा ठाम निर्धार करत ऋतुजा गावच्या सरपंचपदी विराजमान झाली.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Right of primary teachers to participate in active politics
‘प्राथमिक शिक्षकांना सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार’

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मंजरथ हे गाव आहे. गावाची लोकसंख्या साडे तीन हजार असून गावातील मतदारांची संख्या २, ३०० इतकी आहे. ऋतुजा आनंदगावकर या गावची कन्या. ऋतुजाचे वडील श्रीक्षेत्र मंजरथ सोसायटीचे चेअरमन होते. तर आई २० वर्षांपूर्वी पंचायत समितीत उपसभापती होती. आई- वडिल गावातील सामाजिक कामांमध्ये नेहमीच सक्रीय असतात. पुण्यातील नामांकित कॉलेजमधून अॅरॉनॉटिकल इंजिनीअरिंग करणाऱ्या ऋतुजाला अहमदाबादमध्ये नोकरी देखील मिळाली.  ऋतुजा आणि तिच्या सारखीच काही तरुण मंडळी शिक्षण आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असले तरी त्यांना मंजरथसाठी काही तरी करायचे होते. याच दरम्यान गावात निवडणुकीचे वारे वाहू लागले. गावात बदल घडवायचा तर निवडणुकीत उतरायचे, असा निर्धार या तरुण मंडळींनी केला आणि याचे नेतृत्व ऋतुजाकडे सोपवण्यात आले. विशेष म्हणजे ऋतुजाच्या या निर्णयाला आई- वडिलांनीही साथ दिली. आई- वडिलांना गावातील मंडळी ओळखत असल्याने ऋतुजासाठी ती एक जमेची बाजू ठरली.

निवडणुका म्हटलं की प्रचारही आलाच. नोकरी असल्याने प्रचारासाठी वेळ कसा काढायचा, असा प्रश्न तिच्यासमोर होता. ऋतुजा आणि तिच्या टीमने  ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासोबतच डिजिटल प्रचारावरही भर दिला. व्हॉट्स अॅपवर ग्रुप तयार झाले आणि बघता बघता ऋतुजाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. निवडणुकीत त्यावेळचे सरपंचही रिंगणात होते. त्यामुळे ऋतुजासाठी ही निवडणूक तितकी सोपी नव्हती. मात्र, ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गाकडून ऋतुजाला भरभरुन प्रतिसाद मिळू लागला. सरपंचपदासाठी चुरशीच्या निवडणुकीत ऋतुजाने बाजी मारली आणि गावाला अॅरॉनॉटिकल इंजिनिअर केलेली उच्चशिक्षित सरपंच लाभली. शेवटच्या टप्प्यात तिने दोन आठवड्यांची सुट्टी देखील घेतली.

सरपंच झाल्यावर ऋतुजाने पहिले काम केले ते ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी तिने हा निर्णय घेतला. गावातील महिलांसाठी तिने विशेष ग्रामसभाही घेतली. या सभेत महिलांनी त्यांच्या समस्या मांडल्या. ‘महिलांना एक हक्काचे व्यासपीठ हवे होते आणि ती संधी माझ्या माध्यमातून मिळाली’, असे ऋतुजा सांगते. याशिवाय महिलांसाठी गावात सॅनिटरी पॅडचे मशिनही लावण्याचे काम सुरु आहे. उच्चशिक्षित सरपंच म्हणून लोक मला ओळखू लागलेत. त्यांना माझ्याविषयी कुतूहल असते. इंग्रजीत रिप्लाय दिल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनाही सुखद धक्का बसला, अशी आठवणही तिने सांगितली. आत्तापर्यंत मी जितक्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले, त्यांनी मला चांगले सहकार्य केले, असे तिने नमूद केले.

गावात शिवजयंती पारंपारिकपद्धतीने साजरी करण्याचा निर्णय ऋतुजाने घेतला. ग्रामस्थांनीही तिला साथ दिली. गावात दोन दिवस उत्सवी वातावरण होते. गावातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, आरोग्यशिबीर, मुलामुलींसाठी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गावातील नदीतच ही स्पर्धा पार पडली.

भविष्यातील वाटचाल काय असेल असा प्रश्न विचारला असता ऋतुजा म्हणते, वर्षभरापूर्वी मी सरपंच होईल असे वाटले नव्हते. आता पाच वर्षानंतर काय करणार याचा विचार मी तूर्तास केलेला नाही. मात्र, गावासाठी चांगलं काम करतं राहायचं. रोजगारासाठी गावातील अनेकांना बाहेर जावे लागते किंवा साखर कारखान्यात काम करावे लागते. त्यामुळे गावात रोजगार कसा आणता येईल, यावर माझा भर असेल, असे तिने सांगितले. माझा प्रवास आता सुरु झाला आहे. यापूर्वी राजकारण आणि माझा संबंध वृत्तपत्रांपुरता मर्यादित होता. पण आता मी हळूहळू शिकते आहे. सरकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ ग्रामस्थांना कसा घेता येईल, याचा अभ्यास करत असते. आमदारकीचा विचार तुर्तास तरी डोक्यात नाही, असे ती आवर्जून सांगते.

महिला वर्गासाठी ऋतुजा सांगते, तरुणींना स्वतःची एक भूमिका असली पाहिजे आणि ती ठामपणे मांडताही आली पाहिजे. उच्चशिक्षित ऋतूजाचा हा प्रवास आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे हे नक्की.

vishwas.purohit@loksatta.com