वर्धा तालुक्यातील येळाकेळी येथे गावठी दारूविक्री सर्रास सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेळोवेळी धाडी टाकून गावठी दारूचे अड्डे देखील उध्वस्थ केले. पण तरीही चोरी-छुपे दारू विक्री सुरूच असल्याची बाब दारूबंदी महिला मंडळाने आज सकाळी उघडकीस आणली. प्लॅस्टीक पिशवीतून खुली दारू विक्री होत असल्याचे या महिलांनी दारू पिशव्या पकडून देत दाखवून दिले. याबाबत पोलिसांकडे तक्रार झाल्यावर संबंधित दारू विक्रेत्यास अटक करण्यात आली.

मंडळाच्या संघटक पुष्पाताई झाडे व अन्य महिलांनी गावातल्या पारावर या पिशव्या जमा केल्या होत्या. तर, टाळेबंदीच्या काळातही गावठी दारू विक्री सुरूच असल्याचे पुराव्यानिशी निदर्शनास आणणाऱ्या महिला मंडळास दारू विक्रेत्याने धमकावल्याची माहिती समोर आली होती. मात्र या संदर्भात सावंगी पोलिसांना विचारणा केल्यावर या विषयी तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.

मात्र या घटनेची त्वरीत दखल घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. किमान टाळेबंदीच्या काळात तरी दारूबंदी जिल्ह्यातील दारू विक्री बंद करून दाखवावी, असे आवाहन दारूमुक्ती आंदोलनाचे भाई रजनीकांत यांनी केले आहे.