महापालिकेकडून वेळेवर मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने साक्रीरोडवरील फुलेनगर, महाले नगर भागातील संतप्त महिलांसह नागरिकांनी मंगळवारी रात्री महापालिकेवर मोर्चा काढला. तीन वर्षांपासून महिलांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. वारंवार पाठपुरावा करुनही महापालिकेकडून पाणी समस्या सोडविली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. महापौरांसह अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी महिला घरी परतल्या.

मोर्चात अनिल दामोदर, रवींद्र नगराळे, आनंद उशीरे, माधवराव सैंदाणे, प्रदीप जावडेकर, मनीषा नगराळे, पुष्पलता उशीरे, अनिता मिस्तरी आदी सहभागी झाले होते.

महापालिकेकडून पाणीपुरवठा झाल्यानंतरही प्रभाग क्रमांक सातमधील फुलेनगर, महालेनगर भागातील लोकांना पाणी मिळत नाही. जास्त वेळ पाणी पुरवठा सुरु राहिला तरच पाणी मिळते. तीन वर्षांपासून तांत्रिक बाबींमुळे ही समस्या कायम आहे. दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन देऊनही महापालिकेकडून आठ दिवसाआड पाणी दिले जात आहे. तेही पाणी नागरिकांना मिळत नसल्याने फुलेनगर, महाले नगरमधील महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला. दोन दिवसांपूर्वी या भागाला पाणी पुरवठा झाला. परंतु, फुलेनगर, महालेनगरमधील रहिवाशांना पाणी मिळाले नाही. परिणामी, संतप्त महिलांसह नागरिकांनी मंगळवारी रात्री साडेआठला महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरुन कळविण्यात आले. तरीही हे अधिकारी महापालिकेत आले नाहीत. बागूल नामक अधिकाऱ्यासह महापौर चंद्रकांत सोनार हे रात्री महापालिकेत आले. त्यांनी महिलांसह नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यानंतर सर्वजण घरी परतले.

महापालिका निवडणुकीवेळी भाजपकडून दिवसाआड मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सत्तास्थापनेला आता दीड वर्षांचा कालावधी लोटला असतांनाही धुळेकरांना दिवसाआड तर सोडाच, आठ दिवसाआडही मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. अधूनमधून अस्वच्छ पाणी पुरवठय़ाचाही त्रास आहेच. ही समस्या संपूर्ण धुळे शहरात आणि देवपूर परिसरातही आहे.