मुक्त विद्यापीठांच्या पुरस्कारांचे वितरण
महिलांवरील अत्याचाराबाबत सध्या देशभरात चर्चा होत आहे. परंतु, हे अत्याचार, भ्रष्टाचार व इतर सामाजिक प्रश्न समूळ नष्ट करण्याची ताकद स्त्रियांमध्येच आहे. त्याकरिता स्त्रीने प्रथम स्त्रीच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेत्री व दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या सोहळ्यास मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, श्याम पाडेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रुक्मिणी पुरस्कार उल्का महाजन यांच्यातर्फे चंद्रकांत गायकवाड, सोपान सोनार यांना, विशाखा पुरस्कार प्रशांत असनारे, कल्पना दुधाळ, विलास पगार यांनी तर श्रमसेवा पुरस्कार डॉ. रूपा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. या वेळी तळवलकर यांनी विविध विषयांवर परखडपणे मत मांडले. अनेकदा घरातच दोन स्त्रिया एकमेकींना साथ देत नाहीत. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला नातं बदलल्यावर सन्मान देते का याचा विचार केला पाहिजे. मग समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज कसा उठविता येईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्याऐवजी समृद्ध भारतीय संस्कृतीला महत्त्व देणे गरजेचे आहे. समाजात घडणाऱ्या वाईट घटनांबद्दल महिलांनी जागरूक राहून उच्च-नीच, श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करता सर्व स्तरातील घटकांना सोबत घेऊन आवाज उठविण्याची गरज असल्याचे तळवलकर यांनी नमूद केले.
दुबळ्या महिलांना सबळ करण्याचा संकल्प प्रत्येक महिलेने करावा, असे आवाहन या वेळी पवार यांनी केले. आजची तरुण पिढी श्रम करण्यास तयार असून त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सोहळ्यात कुसुमाग्रज अध्यासनातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील डॉ. अनंता सूर, प्रा. तुषार चांदवडकर यांच्यासह उत्तेजनार्थ पारितोषिकाने सुप्रिया पेंढारी व मंगला अहिरे यांना गौरविण्यात आले.