महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शंभरपेक्षा जास्त हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्याचमुळे महाराष्ट्रातून विदर्भ आणि मराठवाडा ही वेगळी राज्ये काढली जाऊ नयेत. महाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे. काँग्रेसची भूमिकाही हीच असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्माण करण्याचे प्रतिपादन केले होते. चितळे यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, मराठवाडय़ाचा अनुशेष भरून काढलेला नाही. या सरकारच्या काळात तर तो अधिकच वाढला आहे. आपण व विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अनुशेष दूर केला तर मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याची गरज उरणार नाही. केवळ मराठवाडाच वेगळा करण्याचा मुद्दा नाही तर विदर्भही स्वतंत्र राज्य निर्माण करावे, या विचाराशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. महाराष्ट्राचे विभाजन करून वेगळे राज्य निर्माण करण्याची भूमिका काँग्रेसला मान्य नाही.

महाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे हीच काँग्रेसची भूमिका आहे आणि ही भूमिकाच कायम राहिल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर विरोधी पक्षांकडून काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश मोर्चाची रणनीती तयार करण्यासाठी औरंगाबादेत काँग्रेसच्या मराठवाडय़ातील पदाधिकाऱ्यांची विभागीय स्तरावरची बैठक घेण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार एम. एम. शेख, नामदेवराव पवार आदी उपस्थित होते.

नागपुरात १२ डिसेंबरला मोर्चा
सरकार हे तारीख पे तारीख वर चालणारे आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री दरवेळी नवनवीन तारीख सांगत आहेत. ही कर्जमाफी फसवी आहे. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न, ऑनलाइन पद्धत, खड्डेमुक्त आणि भारनियमन महाराष्ट्र, या सर्वच पातळय़ांवर सरकार अपयशी ठरले आहे. याच सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादीतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे.