समुद्रकिनाऱ्यावर वनीकरणातून लावलेल्या हजारो सुरु वृक्षांची कत्तल

राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीची जोरदार तयारी सुरू असताना रायगड जिल्ह्य़ातील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून लावण्यात आलेल्या २५ हजार सुरूच्या झाडांपकी सात ते आठ हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आणि पर्यावरण प्रेमीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. वृक्षतोड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

आक्षी येथील समुद्रकिनाऱ्यावर समुद्रकिनाऱ्यालगतच्या शासकीय जागेत सामाजिक वनीकरण विभागामार्फत सुरू वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वनीकरण विभागाने स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून या ठिकाणी २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. समुद्रकिनाऱ्यावर जमिनीची धूप रोखण्यास मदत व्हावी, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि येणाऱ्या पर्यटकांना बसण्यासाठी सावली उपलब्ध व्हावी, हा या मागचा उद्देश होता. वनीकरण विभागाने मोठय़ा कष्टाने ही वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केले होते. त्यानंतर सुरुवन व्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीकडे देण्यात आली होती.

समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुरुची वन आकर्षणाचे ठरत होती. सुरुंच्या सावलीत बसून ते निसर्गाचा आनंद लुटत होते.

मात्र वनीकरण विभागाने सुरुवनावरची देखरेख काढून घेतल्या, लाकूड माफियांनी आपला मोर्चा या वनांकडे फिरवला आहे. दिवसागणिक रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत हजारो सुरुंची कत्तल सुरू झाली आहे. २५ ते ३० फूट उंचीची झाड दररोज नेस्तनाबूत केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

एक झाड लावून ते मोठे होण्यास किमान चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लाकूडमाफिया एका रात्रीत ही झाड नष्ट करीत आहेत. त्यामुळे सुरुच्या वनांची कत्तल करणाऱ्या स्थानिक लाकूड माफियावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

ज्या आक्षी ग्रामपंचायतीला पर्यावरण संतुलन संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याच आक्षी ग्रामपंचायत हद्दीत आज पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. उघडय़ा डोळ्यांनी सुरुच्या वनाची कत्तल सामान्य माणसाला दिसत असली, तरी देखभालीची जबाबदारी असणारी आक्षी ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण विभाग आणि वनविभाग यांचे मात्र वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे निसर्ग अभ्यासकांमध्ये नाराजीचा सूर आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सुरुची झाड ही या परिसरात आढळणाऱ्या, कावळे, बगळे, घारी, गिधाड, समुद्री गरुड, चिमण्या, वटवाघळ, घुबड यांसारख्या अनेक पक्ष्यांची निवासस्थाने आहेत. लाकडाच्या हव्यासापायी या पक्ष्यांची निवासस्थाने उडवली जात आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षतोड तातडीने रोखणे गरजेचे आहे.

राज्यभरात सध्या दोन कोटी वृक्ष लागवडीची तयारी सुरूआहे. रायगड जिल्हय़ातही वनविभागामार्फत एक लाख ४५ हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. मात्र मुंबईपासून जवळच १५ सागरी मलावर असणाऱ्या आक्षी समुद्रकिनाऱ्यावर हजारो वृक्षांची कत्तल सुरू आहे, आणि ही कत्तल रोखण्यास शासकीय यंत्रणा याबाबत उदासीन आहे, असे विरोधाभासी चित्र सध्या पाहायला मिळते आहे.

समुद्रकिनाऱ्यावर  सुरुंची कत्तल सुरू असल्याबाबत आम्ही वनविभागाला वेळोवेळी कळवले आहे. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामसभेने ठराव घेऊन अलिबागच्या वनक्षेत्रपालांना याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले आहे. पण वनविभागाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, असे महेश ऊर्फ शंकर गुरव, सरपंच यांनी सांगितले.

सामाजिक वनीकरणातून या सुरुंची लागवड झाली असली तरी तीन वर्षांनंतर वनव्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात येते. सदर ग्रामपंचायतीने या वनांचे संवर्धन करणे अभिप्रेत असते. त्यामुळे या सुरुवनांची सर्वस्वी जबाबदारी ही आक्षी ग्रामपंचायतीची आहे. तरीही सदर वृक्षतोडीचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून कायद्याच्या चौकटीत राहून संबंधितांवर कारवाई केली जाईल. असे आर. एच पाटील. वनपरिक्षेत्र अधिकारी अलिबाग यांनी सांगितले.