तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. दोन शिफ्टमध्ये काम करुन पाच ते सहा दिवसांत तूर खरेदीची प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अमरावतीमध्ये सर्वाधिक तूरखरेदी बाकी असल्याने त्या भागात केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन झाल्याने बाजारात तुरीचे भाव पडले आहेत. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांतर्गत हमी भावानुसार तूरखरेदी केली जाणार आहे. सरकारने ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी केली असून केंद्रावर उर्वरित नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. तूर खरेदीची प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

अमरावतीमध्ये सर्वाधिक तूर खरेदी बाकी असल्याने त्या भागात तूर खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. या शिवाय कृषी विभागातील पर्यवेक्षक आणि सहाय्यक निबंधकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्या मार्फत तुरीचे जलद ग्रेडेशन करुन खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी खासगी गोदामांचे अधिग्रहण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

राज्यात यंदा १५.३३ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी होऊन भरघोस उत्पादन झाले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पन्नात पाच पटांनी वाढ झाल्याने खुल्या बाजारात तुरीचे भाव घसरले. त्यामुळे सरकारने यंदा तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आत्तापर्यंत ४० लाख क्विंटल तूरखरेदी करण्यात आली असून २२ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या तूरची खरेदी केली जाणार आहे.