कोपरगाव : करोनाची  दुसरी लाट राज्यात तीव्रतेने वाढत आहे,  अशा परिस्थितीत सर्व जण आपापल्या पद्धतीने परिस्थिती अनुभवत आहेत. मात्र याही परिस्थितीत माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष दौरे करून जनजागृती करीत आहेत. त्यामुळे त्यांचे  कौतुक करावे तेवढे थोडे आहे,असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांनी केले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोपरगाव परिसरात भेट देऊन संजीवनी केअर सेंटरची पाहणी केली. त्यानंतर संजीवनी कारखाना कार्यस्थळावर आले असता त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.   माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यावर आजवर आलेल्या प्रत्येक संकटात कोपरगावकर आपले कुटुंब मानून केलेल्या मदतीचा लेखाजोखा सादर केला.   संजीवनी फाउंडेशनच्या वतीने केलेल्या मदत कार्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.  जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी करोना व अन्य सामाजिक कामात निर्माण होणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याबाबत चर्चा केली.

शंकरराव कोल्हे म्हणाले, की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संकटकाळात प्रशासनावर नजर ठेवून त्यांना जागे करीत, सामान्य माणसांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करून काम करत आहेत. आमच्या काळात महापूर, पाणी प्रश्न, दुष्काळ, गारपीट, कुपोषण, आदी प्रश्न मोठे होते, पण सध्या करोनाची महामारी  निर्माण झाली आहे. सध्या एकमेकावर टीका करण्याची ही वेळ नाही.   बाजारपेठा ठप्प झाल्याने आर्थिक उलाढाल मंदावली, व्यापारी अडचणीत आहे.  बेरोजगारी वाढली,करोनाने अनेकांचे कंबरडे मोडले. शारीरिक व नैसर्गिक संकटाने शेतकरी आडचणीत असल्याने केंद्र व राज्य सरकारमध्ये अशावेळी समन्वय असणे गरजेचे आहे.

कोल्हेंच्या आरोग्याचे रहस्य

आयुर्वेदात कोरफडीचे महत्त्व सांगितले जाते,  पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पचनासह इतर शारीरिक  लाभ कोरफडीने होतात म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून आपण कोरफड खात असल्याचे रहस्य शंकरराव कोल्हे यांनी या वेळी उलगडून दाखवले, त्याचे देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले व युवकांनी योग्य आहार, व्यायाम, मानसिक स्थिती उत्तम ठेवून काम करावे असे सांगितले.