आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या विधानामुळे नितिन गडकरी पून्हा एकदा चर्चेत आले आहेत.

परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी दिल्याची माहिती स्वतः गडकरी यांनीच दिली. शनिवारी (दि.17) नागपूरच्या एमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केलं. आपण अधिकाऱ्यांनी कामे न केल्यास त्यांची लाोकांना सांगून धुलाई करु अशी तंबी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना गडकरी यांनी लालफितीच्या कारभराविषयीही नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले गडकरी –
आज मी परिवहन कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीला परिवहन आयुक्तही उपस्थित होते. यावेळी मी त्यांना म्हंटलं की तुम्ही आठ दिवसांच्या आत लोकांच्या समस्या सोडवा अन्यथा लोकांना कायदा हातात घ्यायला सांगून तुमची धुलाई करायला सांगेन. जी व्यवस्था न्याय देत नाही तिला आपण फेकून द्यायला हवं असं आपल्या शिक्षकांनी शिकवल्याचेही गडकरी पुढे म्हणाले. आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. मी त्यांना सांगू इच्छीतो की तुम्ही सरकारी नोकर आहात आणि मी लोकांमधून निवडून आलोय. त्यामुळे मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चोरी करत असाल तर मी तुम्हाला एक चोर म्हणेन. उद्याजकांनी कोणतीही भीती मनात न ठेवता व्यवसाय करा, अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत असंही गडकरी पुढे म्हणाले.