अध्यक्ष राजश्री घुले, थोरात समर्थक अजय फटांगरे यांच्यात खडाजंगी

नगर : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपलब्ध केलेल्या निधीतील कामाचा कार्यारंभ आदेश जिल्हा परिषदेने अडवून ठेवल्याचे आज, गुरुवारी उघड  झाले. या प्रकरणावरून जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले व थोरात यांचे कट्टर समर्थक, माजी सभापती अजय फटांगरे यांच्यामध्ये खडाजंगी उडाली. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची सत्ता असली तरी या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचेच यानिमित्ताने उघड  झाले आहे.

पानोडी पाणी योजना चालवण्यास देण्याच्या कारणावरूनही आजी-माजी अध्यक्षामध्ये वादंग रंगले आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे वाटप असमान पद्धतीने झाल्याबद्दलही सदस्यांमध्ये तीव्र नाराजीची प्रतिक्रिया आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज श्रीमती घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांमधील राजकीय हेवेदावे समोर आले. अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरूनही त्यामध्ये तेल ओतले गेले.

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Chief Minister eknath shinde order on BJPs letterhead ruled illegal by High Court
भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर…

संगमनेर तालुक्यातील देवकौठे ते मलाडोण या सुमारे अडीच किलोमीटर रस्त्यासाठी महसूल मंत्री थोरात यांनी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला. मात्र या रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेशच गेल्या दीड महिन्यापासून दिला गेलेला नाही. याबद्दल माजी सभापती फटांगरे यांनी, कार्यारंभ आदेश का अडवला गेला आहे, अशी विचारणा सभेत केली. त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी (उत्तर विभाग) अध्यक्षांची सही झालेली नाही, असे स्पष्ट केले. त्यातून घुले व फटांगरे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. या खडाजंगीने इतर पदाधिकारीही अवाक झाले.

जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असूनही आमची कामे होत नाहीत, अडवली जातात. विरोधकांची काम होतात. यापेक्षा पूर्वीच्या अध्यक्षांच्या काळात कामे होत होती, असा टोला फटांगरे यांनी लगावला. घुले यांनी फाईल मागून घेत त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी सही केली नसल्याचा व केवळ कार्यकारी अभियंता व सभापती यांचीच सही असल्याचा खुलासा केला. त्यानंतर फटांगरे यांनी १५ व्या वित्त आयोगातून पदाधिकाऱ्यांनी निधी घेतला, मात्र सदस्यांच्या तोंडाला पाने पुसली असा खळबळजनक आरोप केला. मात्र त्याचवेळी माजी अध्यक्ष शालिनीताई विखे सभेस उपस्थित झाल्या. त्यामुळे हे वादंग तेथेच थांबले. मात्र नंतर पुढे पानोडी गावच्या प्रादेशिक पाणी योजनेवरून आजी-माजी अध्यक्षांमध्ये वादंग रंगले.

पानोडी व नऊ गावांची प्रादेशिक योजना विखे यांच्या राहता तालुक्यातील कार्यक्षेत्रात आहे. ती थोरात यांच्या नेतृत्वाखालील  संगमनेर सहकारी कारखान्याला चालवण्यास देण्यात आली आहे.  मात्र या कार्यक्षेत्रातील गावांना वैयक्तिक पाणी योजना असताना प्रादेशिक योजना का चालवली जात आहे, असा हरकतीचा मुद्दा विखे यांनी उपस्थित केला. त्यावरून दोघींमध्ये वादंग झाल्याचे समजते. मात्र पानोडी योजना संगमनेर कारखान्याला चालवण्यास देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सदस्य हवालदिल

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. भाजप विरोधी पक्ष आहे. मात्र जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीत पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे वेळोवेळी उघड होत आहे. त्यामुळे भाजपकडून, विशेषत: विखे गटाकडून अध्यक्ष घुले यांना कोंडीत पकडण्याचा प्रसंग वारंवार उद्भवतो. पदाधिकारी निधीचे असमान वाटप करतात असा सदस्यांचा प्रामुख्याने आक्षेप आहे. मात्र सदस्यांना अद्याप त्यावर दाद मिळालेली नाही. आता खुद्द काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री थोरात यांनीच उपलब्ध केलेल्या निधीतील काम अडवण्यात आल्याचे, त्यांच्याच समर्थकांनी उघड केल्याने, जिल्हा परिषदेतील आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही हेच स्पष्ट होत आहे. सदस्यांचा कार्यकाल संपत आल्याने त्यांना गटातील कामे मंजूर व्हावीत अशी अपेक्षा आहे. मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.