28 September 2020

News Flash

अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठेकेदारांकडून काम बंदचा इशारा

मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑगस्टपासून आंदोलन

मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑगस्टपासून आंदोलन

पालघर : तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या ठेकेदारांच्या विविध मागण्यांबाबत  एनपीसीआयएल व्यवस्थापन कोणताही निर्णय घेत नसल्याने प्रकल्पातील संबंधित सर्व ठेकेदारांनी १३ ऑगस्टपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. तारापूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने या बाबतचे पत्र टॅप्स व्यवस्थापन तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक इतर संबंधितांना दिले आहे.

तारापूर अणुऊर्जा केंद्र १ ते ४ मध्ये सुमारे ४० ते ४५ ठेकेदारांमार्फत हजार ते बाराशे कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे कामगार किरणोत्सर्गी तसेच किरणोत्सर्गाची बाधा नसलेल्या भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या ठेक्याअंतर्गत काम करत आहेत. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर या सर्व कामगारांना टाळेबंदी काळातील पूर्ण वेतन देण्यासंदर्भात टॅप्स व्यवस्थापनाने ठेकेदारांना निर्देश दिले होते. मात्र टाळेबंदीच्या काळामध्ये फक्त हजर असलेल्या कामगारांचे वेतन ठेकेदारांना देण्याचे व्यवस्थापनाने भूमिका घेतली. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात कामावर हजर नसणाऱ्या कामगाराच्या वेतनाचा भार कोणी सोसावा याबाबत अनिश्चितता कायम आहे.

दरम्यान सर्व ठेकेदारांकडून एनपीसीआयएल व्यवस्थापनाने टाळेबंदी काळातील कामगारांचे वेतन पूर्णपणे देण्यासंदर्भात हमी पत्र व ना हरकत दाखला लिहून घेतला आहे. यापूर्वी सन २०१४ व २०१६ मध्ये वेतनवाढीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे येथील ठेकेदारांचे सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम अडकून पडली असल्याचे ठेकेदारांकडून सांगितले जात आहे. त्याप्रमाणेच नव्याने अशीच परिस्थिती निर्माण होईल व येथील ठेकेदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टाळेबंदीच्या काळात पूर्ण झालेल्या ठेक्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर बिलांची रक्कम अदा करण्यास एनपीसीआयएल व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याने ठेकेदारांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

‘टॅप्स’ व्यवस्थापनाशी ई—मेलवरून संपर्क

कामामधील नफ्याच्या टक्केवारीत वाढ करून घेण्यात यावी तसेच कामावर देखरेख करणाऱ्या पर्यवेक्षक व अभियांत्रिकी यांचा पगार ठेक्यामध्ये अंतर्भूत करण्यात यावा अशा अनेक मागण्या प्रलंबित असून या संदर्भात ठेकेदाराने टॅप्स व्यवस्थापनाबाबत यापूर्वी झालेल्या बैठकांमधून कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे ठेकेदारांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक कुचंबणा करू पाहणाऱ्या व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी १३ ऑगस्टपासून या प्रकल्पातील ठेकेदारांमार्फत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी टॅप्स व्यवस्थापनाशी ई—मेल वरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद देण्यात आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 2:32 am

Web Title: work stop warning from nuclear power plant contractors zws 70
Next Stories
1 करोनामुळे रिक्षाचालकांवर आर्थिक अरिष्ट
2 माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन
3 सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांना पूर
Just Now!
X