शहर बस सेवा (एएमटी) तातडीने सुरू करावी अशी मागणी या व्यवस्थेची कंत्राटदार कंपनी प्रसन्ना पर्पलच्या कामगारांनी महानगरपालिकेकडे केली आहे. या कामगारांनी शुक्रवारी मनपाचे उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांना याबाबत निवेदन दिले.
या व्यवस्थेवरील वाढत्या तोटय़ामुळे मनपाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी कंत्राटदार कंपनीने केली होती. त्यांनी मासिक ७ लाख रुपये त्यापोटी मागितले होते. मात्र मनपाच्या स्थायी समितीने त्याला विरोध दर्शवत आधी दिलेली नुकसान भरपाईसुध्दा बेकायदेशीर ठरवली. स्थायी समितीच्या या निर्णयानंतर कंत्राटदार कंपनीने बुधवारपासून ही सेवा बंद केली आहे. याबाबत नागरिकांमध्ये असंतोष असतानाच आता या व्यवस्थेतील कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या कामगारांनी निवेदनात म्हटले आहे, की या व्यवस्थेवर सुमारे दीडशे कामगार कार्यरत होते. ही सेवा बंद झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचाच चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांचेही मोठे हाल होत आहेत. कधीकाळी राष्ट्रीय स्तरावर चांगल्या सुविधेचे पारितोषिक मिळवलेली ही सेवा बंद होणे सर्वार्थानेच चुकीचे आहे. या सेवेत कामगारांचाही मोठा वाटा होता, या सगळ्या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन ही सेवा सुरू करावी अशी मागणी या कामगारांनी केली आहे.