लोकसत्ता वार्ताहर

वाडा : तालुक्यातील मुसारणे  येथील हॉरबिगर  कंपनीतील १०६ कामगारांना कामावरून कमी केल्याबद्दल अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने गुरुवारी  न्याय मागण्यासाठी तहसील कार्यालयात धडक दिली.  वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी कंपनी प्रशासनालाही या वेळी बोलावून चर्चा केली मात्र काहीही निष्पन्न न झाल्याने या कामगारांना नाराज होऊन परतावे लागले.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या २२ मार्चपासून कंपनी बंद करण्यात आल्याने  या कंपनीतील  १०६ कंत्राटी कामगारांनाही कामावर येणे बंद केले. गेल्या तीन महिन्यांपासून कंपनी सुरु करण्यात आली आहे. मात्र गेली अनेक वर्षे काम करीत असलेल्या येथील १०६ कामगारांना कंपनी प्रशासनाने अजूनपर्यंत कामावर परत बोलविले नाही. या सर्व कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकण्यात आले असून नव्याने काही कामगारांची भरती करण्यात आल्याचा आरोप  कामावरून कमी केलेल्या कामगारांनी केला आहे.

या  १०६ कामगारांना  पुन: रुजू करून घेण्यात यावे, कंपनी व मजूर ठेकेदार (लेबर कॉन्ट्रॅक्टर) यांच्यातील कंत्राट बनावट ठरवण्यात येऊन ते रद्द करण्यात यावे, तसेच परिशिष्ट अ मधील सर्व कामगारांना कंपनीच्या सेवेत कायम कामगार म्हणून सामावून घेण्यात यावे अशी  कामगारांनी केली असल्याचे   युनियनचे  संघटक जगदिश चौधरी यांनी सांगितले.

मागणी घटल्याने कंपनीतून उत्पादन कमी काढले जाते, त्यामुळे कामगारांची संख्या कमी केली आहे. उत्पादन वाढल्यानंतर या कंत्राटी कामगारांना परत बोलविले जाईल.
– संतोष देशमुख, व्यवस्थापक, हॉरबिगर कंपनी.