जागतिक पर्यटनस्थळाकडे कसे बघावे, याची माहिती देण्यासाठी १२८ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या वेरुळ आणि अजिंठय़ाच्या पर्यटक मार्गदर्शन केंद्रात शुकशुकाटच असतो. विशेषत: वेरुळच्या मार्गदर्शन केंद्रात सरासरी ५० पर्यटकही जात नसल्याचे निरीक्षण राज्य पर्यटन महामंडळाने नोंदवले आहे. त्या तुलनेत अजिंठय़ातील केंद्रात निदान दीडशेच्या आसपास तरी पर्यटक जाऊन येतात. मात्र, तरीही पर्यटकांचा ओघ जेवढय़ा प्रमाणात वेरुळ-अजिंठय़ाकडे होणे अपेक्षित आहे तितक्या प्रमाणात तो होताना दिसत नाही. वारसा जपण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्चूनही महामंडळाला या ठिकाणी शुकशुकटाच आढळतो.
गेल्या वर्षभरात ३ लाख ९० हजार ८०१ भारतीय तर २४००८ विदेशी पर्यटकांनी अजिंठय़ाची लेणी पाहिली. ही लेणी पाहण्यापूर्वी लेणी बघावी कशी, त्या काळातील आर्थिक-सामाजिक रचना काय होत्या, लेणी आणि चित्रातून कलाकारांनी कोणती लोककथा सांगितली आहे, याची माहिती मिळावी म्हणून मार्गदर्शन केंद्र बांधण्याचे ठरविण्यात आले. ६७ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या आलिशान मार्गदर्शन केंद्रात १४ कोटी रुपये खर्चून प्रतिरूप लेणीही उभारण्यात आली. ७१ कोटी रुपये खर्चून उभारलेली इमारत पर्यटकांसाठी खुली झाली. मात्र, तिकडे कोणी फिरकेच ना! महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मते तेथे अजून ‘कॅफेटेरिया’ सुरू झाला नाही. या अनुषंगाने निविदाही काढण्यात आल्या. पण त्या काढताना इमारतीचे बांधकाम आणि झालेली गुंतवणूक याचा हिशेब करून ठेकेदाराने किमान किती रक्कम भरावी, याचे गणित मांडले गेले. ते एवढे अधिक होते की कोणी ठेकेदार पुढे आलाच नाही. या पर्यटन केंद्राची प्रसिद्धीच केली गेली नाही.
‘‘मुळात मार्गदर्शन केंद्र लेणींच्या जवळ उभारलेच का गेले, हा प्रश्न आहे. येणाऱ्या माणसाकडे तसा वेळ कमीच असतो. जेवण, शॉपिंग यातही बराच वेळ जातो. अजिंठय़ासारख्या ठिकाणी लेणीपर्यंत जाण्यापूर्वी बसने प्रवास करावा लागतो. परिणामी मूळ लेणी पाहण्यातच पर्यटकांना रस असणे स्वाभाविक आहे, असे मत लेणींच्या अभ्यासक दुलारी कुरेशी यांनी मांडले.