News Flash

तंबाखू विरोधी दिन : लातूरमध्ये ‘मटरेल’ची कोटय़वधींची उलाढाल

लातूर शहरातील शिवाजी चौकात किंवा गंजगोलाईमध्ये सुपारी कातरणारे अनेकजण पोते टाकून बसलेले असतात

प्रदीप नणंदकर, लातूर

‘झालं का मटरेल तयार, घास  अजून जरा’! लातूर शहरात चौकाचौकांत हे वाक्य ऐकायला मिळणारच. कारण शहरात आठ हजार पानटपऱ्या आहेत. एका पानटपरीवर तिघांना व्यवसाय मिळतो. कारण सुपारी आणि सुगंधित तंबाखूचे मिश्रण चुना आणि पाणी टाकून घासले की, लातूरकरांच्या भाषेत त्याचे ‘मटरेल’ तयार होते. सुपारी कातरणाऱ्या आणि सुपारी तंबाखूसह घासून देण्याचा व्यवसाय लातूरमध्ये गेली अनेक वर्षे सुरू आहे. तंबाखू विरोधी दिनाच्या पाश्र्वभूमीवर विरोध करताही येईल, पण ‘मटरेल’ कसे बंद करणार? सुगंधित तंबाखूचा दर साधारण दहा हजार रुपये किलो एवढा आहे. एकूण सुपारी आणि तंबाखूची उलाढाल कितीची असेल याचे हिशेब ज्याचे त्यानेच करावे. पण हा हिशेब फक्त लातूर शहरात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

लातूर शहरातील शिवाजी चौकात किंवा गंजगोलाईमध्ये सुपारी कातरणारे अनेकजण पोते टाकून बसलेले असतात. किराणा दुकानातून आलेली ‘छालिया’ सुपारी कातरण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सुपारीचा पातळ काप काढण्यासाठी हातभर लांब अडकित्ते येथील ‘कुशल’ कामगारांच्या हातात दिसतात. त्यामुळे सुपारी कातरणाऱ्या माणसाला साधारणत: ३०० ते ५०० रुपये मिळतात. लातूरमध्ये प्रत्येक टपरीवर अशी सुपारी पोहोचवली जाते. केवळ सुपारी कातरणारे नाही तर सुगंधित तंबाखूचे मिश्रण केल्यानंतर त्यात चुना आणि पाणी टाकून घासून देणाऱ्यांची संख्याही एवढी अधिक आहे की, त्यांचे काम दोन पाळय़ात चालते. पहाटे पाच ते सकाळी दहापर्यंत व सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत अशी कामाची वेळ. कमाई ३०० रुपयांची. सुपारी कातरण्याचे काम करणारे ५००पेक्षा अधिक तरुण शहरात आहेत. ते वजनावर सुपारी कातरण्याचे काम करतात.

काही पानटपऱ्यांवर सुपारी घासण्याचे लोखंडी यंत्र बसवलेले आहे. प्रत्येकाच्या आवडीनुसार सुपारी तयार करून दिली जाते. लातुरात मिळणारी घासलेली सुपारी राज्यातील अन्य शहरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवासाला बाहेर जाणारी मंडळी पुडय़ा बांधून घेऊन जातात.

घासलेली सुपारी घरी पोहोचवण्याची सेवा देणाऱ्या ५० पेक्षा अधिक पानटपऱ्या आहेत. दररोज सरासरी एक हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या पाच हजारपेक्षा अधिक, पाच हजार उत्पन्न असणाऱ्या ५०० पेक्षा अधिक तर काहोी पानटपऱ्यांचे उत्पन्न १० हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत आहे. पानटपरीच्या व्यवसायावर बहुमजली इमारत, शेती अशी कमाई करणारे अनेकजण आहेत. पानटपरीला लागणारा ठोक माल विकणारे सुमारे १०० पेक्षा अधिक व्यावसायिक आहेत.

कोटय़वधींचा मावा, मटरेल, खर्रा

काजू-१००० रुपये, बदाम-८०० ते ९०० रुपये आणि सुगंधित सुपारीची किंमत साधारणत: आठ हजार रुपये किलो. गुटखा खाणाऱ्यांची तर मोठी गंमत आहे. माणिकचंदसाठी या टपरीवरून त्या टपरीवर जायचे. खास लपवून ठेवलेला गुटखा टपरीचालकाने काढून द्यायचा. त्या एका पुडीची किंमत कधी-कधी १०० रुपयांपर्यंत गेलेली असते. जागतिक तंबाखू विरोधी दिवस करणारी पत्रके छापण्यापलीकडे फारसे काही होत नाही. कारण सुगंधित तंबाखूची २० ग्रॅमची किंमत १०० रुपये एवढी आहे. तर १२० आणि ३०० अशा दोन सुगंधित जर्दाचे एकत्रीकरण करून ‘४२०’चे मटेरियल आता २० रुपयांपर्यंत मिळते. त्यातील बाबा ६००च्या १० ग्रॅम जर्दासाठी ६०० रुपये लागतात. म्हणजे ६० हजार रुपये किलो. आता ‘मटरेल’ खा किंवा इतर जिल्ह्य़ात बोलीभाषेत वापरला जाणारा ‘मावा’ खा, व्यसनाधीनतेचे अर्थकारण कोटय़वधींचे असते, हेच खरे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 1:53 am

Web Title: world no tobacco day tobacco business in latur
Next Stories
1 राज्यातील अहिल्यादेवींच्या सभागृहांसाठी ४०० कोटींची तरतूद
2 आगामी निवडणुकीनंतर राज्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता – आंबेडकर
3 एव्हरेस्ट वीर निहाल गेला.. लोकांची देणी कशी द्यायची?
Just Now!
X