महाराष्ट्रातील बळींची संख्या ७२ हजार

पुणे : तंबाखू, तंबाखूजन्य उत्पादने आणि धूम्रपान यांमुळे भारतात दरवर्षी तेरा लाखांहून अधिक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. ‘ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सव्‍‌र्हे’ या संस्थेने ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातही तंबाखूमुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या वार्षिक ७२ हजारहून अधिक आहे.

‘ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सव्‍‌र्हे’ ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली तंबाखू निर्मूलनासाठी कार्यरत आहे. भारतात जून २००९ ते जानेवारी २०१० या काळात संस्थेतर्फे पहिल्या टप्प्यातील, तर ऑगस्ट २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या काळात दुसऱ्या टप्प्यातील  सर्वेक्षण करण्यात आले. ही संस्था तंबाखू वापरावर नियंत्रण, तंबाखूपासून नागरिकांचे संरक्षण करणे तसेच तंबाखूमुक्त होण्यासाठी व्यसनी व्यक्तींना मदतीचा हात देणे अशा स्वरूपाचे काम करते.

दुसऱ्या टप्प्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून भारतात १९ टक्के पुरूष, २ टक्के महिला तर एकूण प्रौढांपैकी सुमारे १०.७ टक्के नागरिक धूम्रपान करत असल्याचे समोर आले आहे. २९.६ टक्के पुरुषआणि १२.८ टक्के महिला धूम्रपान व्यतिरिक्त तंबाखूचे सेवन करतात. तंबाखू सेवन आणि किंवा धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण पुरुषांमध्ये ४२.४ टक्के आणि महिलांमध्ये १४.२ टक्के एवढे आहे. इतरांनी केलेल्या धूम्रपानामुळे विविध आजारांना बळी पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण देखील लक्षणीय आहे.

सुमारे ३८.७ व्यक्ती घरातील इतर व्यक्तींच्या धूम्रपानामुळे, ३०.२ टक्के व्यक्ती कामाच्या ठिकाणी तर ७.४ टक्के व्यक्ती उपाहारगृहांमध्ये इतरांनी केलेल्या धूम्रपानामुळे त्रास अनुभवतात.

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले,की तंबाखूसेवन तसेच धूम्रपान यांमुळे विविध प्रकारचे आजार संभवतात. हृदयरोग, फुप्फुसाचे विकार तसेच कर्करोग हे यातील काही प्रमुख आजार आहेत. त्याव्यतिरिक्त कायमस्वरूपी औषधोपचार घ्यावे लागणारे आजारही उद्भवतात. त्यात प्रामुख्याने डोळ्यांचे विकार, त्वचेचे विकार, पायांच्या संवेदना क्षीण होऊन येणारे अपंगत्व, तसेच अस्थमा यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाढते प्रमाण

शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यात दररोज पाचशे तीस मुले तंबाखू सेवनाला बळी पडत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. तंबाखू उत्पादक कंपन्यांनी नवे ग्राहक म्हणून विद्यार्थ्यांना लक्ष्य केले असून यावर नियंत्रण आणण्यासाठी शैक्षणिक संस्थांपासून शंभर यार्ड पर्यंत तंबाखूमुक्त वातावरण ठेवणे गरजेचे असल्याचे संबंध फाउंडेशनच्या माध्यमातून तंबाखू निर्मूलनासाठी प्रयत्नशील असलेले संजय सेठ यांनी सांगितले.