जागतिक ‘मेंदूघात’ दिन आज * मेंदूरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

नागपूर : विविध कारणांमुळे ‘मेंदू घाता’च्या (ब्रेन स्ट्रोक) रुग्णांची संख्या वाढत आहे. मेंदूरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार या आजाराच्या सुमारे ३० टक्के रुग्णांना कायमचे अपंगत्व येण्याचा धोका असतो. २९ ऑक्टोबरला जागतिक ‘मेंदूघात’ दिन असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले की, जगभर ‘मेंदूघात’ला मृत्यूचे तिसरे कारण म्हटले जाते. अपंगत्व येण्यासाठी हा आजार पहिले कारण ठरतो. मेंदू घाताचा झटका आल्यावर मेंदूचा जो भाग खराब होतो. त्यातून मानवाच्या शरीरावर नियंत्रण करणारा भाग निकामी होतो. मेंदूघाताचे लक्षणे ओळखण्यासाठी त्या व्यक्तीचा चेहरा, हात आणि बोलणे लक्षपूर्वक बघितले जाते. ते दिसलेल्या रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. मेंदूघाताच्या रुग्णाला साडेचार तासांच्या आत उपचार मिळाले तर तो बरा होण्याची शक्यता खूप जास्त होते. ५० ते ७० टक्के रुग्ण हे आपले दैनंदिन कार्य करू शकतात. अटॅक आल्यानंतर ९० दिवसाच्या आत रुग्णाला विशिष्ट व्यायाम देणे आवश्यक आहे. वय झाल्यानंतरच अर्धागवायूचा झटका येतो असेही नाही. मेंदूघाताच्या २० टक्के रुग्णांचे वय हे चाळीस वर्षांखाली असते. सहापैकी एका व्यक्तीला अकाली असे आजार होत असल्याचे आकडेवारी सांगते. नियमितपणे व्यायाम आणि व्यसनांचा त्याग करून जीवनशैली सुधारल्यास या आजारांपासून दूर राहणे शक्य असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून डॉ. मेश्राम यांनी सांगितले.

लक्षणे

* ओकारीसह डोकेदुखी

* शरीराचे संतुलन बिघडणे

* कमी दिसण्याचा त्रास

* पक्षघाताचा भास होणे