जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त उपक्रम

जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त अंध, अपंग, मुकबधीर, अनाथ मुले व ज्येष्ठ नागरिकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोफत जंगल सफारी घडवून आणण्यात आली. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड यांच्या पुढाकारातून हा स्तुस्त्य उपक्रम राबविण्यात आला.

ताडोबात १ ते ७ ऑक्टोबर या जागतिक वन्यजीव सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन ताडोबा प्रकल्पात करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून अंध, अपंग, मूकबधीर, अनाथ मुलांना ताडोबाची जंगल सफारी घडवून आणण्यात आली. नागपूरची वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्ट अनाथ मुलींचे संगोपन व शैक्षणिक बौध्दिक विकास करणारी संस्था विदर्भातील, तसेच इतर राज्यातील मुलींचे संगोपनाचे काम करते.

या संस्थेच्या वतीने ५० अनाथ मुलींना ताडोबा जंगल सफारीसाठी येथे आणण्यात आले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीव गांधी महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष मतीन शेख यांच्या मदतीने या सर्व मुलींची राहण्याची व जेवणाची व्यवस्था राजीव गांधी महाविद्यालयात करण्यात आली होती, तसेच नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील मुकबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांनाहीो यावेळी जंगल सफारीचा मोफद आनंद घेण्याची संधी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड यांनी उपलब्ध करून दिली.

काल, बुधवारी दुपारच्या सुमारास मुकबधिर विद्यालयाचे सुमारे ३० विद्यार्थी ताडोबात दाखल झाले. यावेळी त्यांना बस व एक टाटा सुमो उपलब्ध करून देण्यात आली. यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी ताडोबात जंगल भ्रमंती केली.

मोहुर्ली येथील ज्येष्ठ नागरिक व महिलांनाही काल वन्यजीव सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ताडोबा सफारीचा आनंद देण्यात आला. या सर्वानी ताडोबात मनसोक्त भ्रमंती केली.