येत्या २१ डिसेंबरला जगबुडी होणार, सगळी पृथ्वी नष्ट होणार, सात अब्ज संख्येचा मानववंश जीवसृष्टीसह नष्ट होणार, अशा वावडय़ा गेले वर्षभर उठत असताना आता प्रत्यक्षात खरंच तसं काही होणार नाही ना ,या शंकेने भयव्याकूळ झालेल्या लोकांना दिलासा देणारी व असे काहीच घडणार नसल्याचे स्पष्टीकरण देणारी नासाची व्हीडिओ चित्रफीत यू टय़ूबवर आधीच प्रसारित झाला आहे. नासाला जग नष्ट होणार नाही या प्रतिदाव्याबाबत खात्री असतानाही त्यांनी ही चित्रफीत अगोदरच प्रसारित करण्याच्या उद्देशाने का तयार केली नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही चित्रफीत २२ डिसेंबरला प्रसारित केली जाणार होती, पण ती आधीच प्रसारित झाली हे उलट चांगलेच झाले. विशेषत: चीन व इतर काही देशात जगबुडी होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून काही जणांना त्यामुळे अटकही झाली आहे.
माया संस्कृतीच्या दिनदर्शिकेतील भाकितानुसार यंदा ख्रिसमस होणार नाही, त्या आधीच पृथ्वी नष्ट होईल असे बरेच काहीसे सांगितले गेले आहे.त्या बाबत नासाच्या ध्वनिचित्रफितीत म्हटले आहे की, जर तुम्ही ही चित्रफीत बघत आहात याचा अर्थ जग काल नष्ट झालेले नाही. (अर्थात येथे २२ डिसेंबरला ती दाखवली जाते आहे हे गृहीत धरले आहे).
ख्रिसमसच्या अगोदर चार दिवस जग नष्ट होणार असल्याच्या भाकिताने जगभरात खळबळ उडवून दिली होती. काहींनी तर सुरक्षित ठिकाणे शोधून तिथे जाण्याच्या योजनाही आखल्या होत्या. पण जग नष्ट होणार हे भाकीत चुकीचे असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. नासाच्या संकेतस्थळावर ‘बियाँड २०१२- व्हाय द वर्ल्ड वोन्ट एन्ड’ नावाने ही ध्वनिचित्रफीत टाकण्यात आली आहे.
माया संस्कृतीची दिनदर्शिकाही याच दिवशी संपते आहे असे सांगितले जाते. त्यावर नासाने म्हटले आहे की, आपल्या स्वयंपाकघरातील दिनदर्शिका ३१ डिसेंबरला संपते तेव्हा जगबुडी होत नाही. त्यामुळे माया संस्कृतीची दिनदर्शिका २१ डिसेंबरला संपते असे गृहीत धरले तरी जगबुडी होणार नाही.
निबिरू नावाचा कथित ग्रह पृथ्वीवर आदळणार आहे असे एक कारण सांगितले जाते. त्यावर असे सांगण्यात आले की, हा ग्रह मे २००३ मध्ये पृथ्वीवर आदळणार असे भाकीतही करण्यात आले होते. ते चुकीचे ठरले, त्यामुळे आता तो डिसेंबर २०१२ मध्ये पृथ्वीवर आदळणार असल्याचे सांगण्यात आले त्यात काही तथ्य नाही. खगोलजीवशास्त्रज्ञ डेव्हीड मॉरिसन नासाच्या या व्हिडिओत सांगतात की, जर असा काही ग्रह पृथ्वीवर आदळणार असता तर तो एक चमकदार व प्रकाशमान पदार्थ असता व तो पृथ्वीवरील सर्वानाच दिसला असता.     

जगबुडीची सांगितलेली कारणे व त्याचे नासाने दिलेले स्पष्टीकरण
जग डिसेंबर २०१२ मध्ये नष्ट होणार अशी संकेतस्थळांवर चर्चा आहे त्याचे काय?
उत्तर- असे काही होणार नाही. पृथ्वी नष्ट होणार नाही. तिला चार अब्ज वर्षे तरी धोका नाही.
माया कॅ लेंडर या तारखेला संपते त्यामुळे पृथ्वी नष्ट होणार आहे का?
उत्तर- हा गैरसमज आहे, आपली दिनदर्शिका अनेकदा डिसेंबर महिन्यात संपते तेव्हा पृथ्वी नष्ट झाली आहे का? मग माया दिनदर्शिकेच्या बाबतीत असे काही वेगळे घडण्याचे कारण नाही.
निबिरू नावाचा ग्रह पृथ्वीवर आदळणार आहे काय?
उत्तर- सुमेरियनांनी निबिरू नावाचा ग्रह शोधला होता व तो पृथ्वीवर आदळणार असल्याचे सांगितले गेले. मे २००३ मध्येही तो पृथ्वीवर आदळणार होता. मग त्याला डिसेंबर २०१२ पर्यंत मुदतवाढ दिली यात काहीच तथ्य नाही. एखादा ग्रह पृथ्वीवर आदळणार असेल तर तो फार जवळ येईल व ते सर्वानाच कळेल. त्यात गुपित काहीच असणार नाही. ‘इरिस’ नावाचा एक ग्रह खरोखर आहे, पण तो पृथ्वीपासून जवळात जवळ चार अब्ज मैल अंतरावर येऊ शकतो. त्यामुळे त्याचा धोका नाही.
२३ व २५ डिसेंबरला जगभरात काळोख होणार आहे का ?
उत्तर- नासा किंवा कुठल्याही वैज्ञानिक संस्थेने असे सांगितलेले नाही. विशिष्ट वैश्विक रचनेमुळे तसे होईल असे सांगितले असले तरी त्यात तथ्य नाही.
ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे जग नष्ट होइल काय?
ग्रहांच्या स्थितीमुळे जग नष्ट होत नाही. १९६२, १९८२ व २००० मध्येही विशिष्ट ग्रहस्थिती होती त्यामुळे काहीच झाले नाही. ग्रहस्थितीचा अगदी नगण्य परिणाम असतो. डिसेंबरमध्ये पृथ्वी व सूर्य आकाशगंगेच्या मधोमध रेषेत येतात; पण ते नेहमीचेच आहे.
ध्रुवीय बदलांमुळे जग नष्ट होईल काय?
नाही, असे काही होणार नाही. पृथ्वीची फिरण्याची दिशाच बदलणे अशक्य आहे. दर चारलाख वर्षांनी चुंबकीय बदल होतात, पण त्याचा पृथ्वीवर काही परिणाम होणार नाही.
पृथ्वीवर लघुग्रह, धूमकेतू, उल्का आदळून ती नष्ट होईल काय ?
नाही, यापूर्वी असा मोठा आघात साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाल्याचे मानतात. त्यात डायनॉसॉर नष्ट झाले असे म्हणतात, पण नजीकच्या काळात असा कुठलाही ग्रह, धूमकेतू, उल्का पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाही. पृथ्वीच्या निकट आलेल्या पदार्थाचे फार बारकाईने निरीक्षण करण्याचा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे.