मालवण तालुक्यातील आचरा येथील कलांगण संस्थेच्या वतीने आचरे ग्रामस्थ आणि योगप्रेमी यांच्या वतीने आचऱ्यात जागतिक योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ६ वाजता योगशिक्षिका वर्षां सांबारी यांनी सर्वाकडून योगाची प्रात्यक्षिके करवून घेतली. नियमित योगाच्या वर्गाला येणाऱ्या बाबासाहेब हजारे दाम्पत्याचा अशोक कांबळी आणि अरुंधती कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघ आचऱ्याचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी कलांगणचे संचालक नीलेश सरजोशी यांना सन्मानित केले.

यावेळी मांगारीश सांबारी, मंदार सांबारी, आशीष पेडणेकर, शैलेश वळंजू, श्रावणी प्रभू आदींनी आपले अनुभव कथन केले. साताऱ्याच्या उमा चौगुले यांच्यामुळे ही संधी आचरावासीयांना मिळाली. योगपुरुष श्रीकृष्णाचा आदर्श प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आवाहन नीलेश सरजोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश ठाकूर यांनी केले.