जालना लोकसभा मतदारसंघात मागील तुलनेत १०.२३ टक्के मतदान वाढले. १० लाख ६५ हजार ४४३ मतदान झाले असून, यात ४ लाख ६९ हजार ५१४ स्त्री मतदार आहेत. जालना विधानसभा क्षेत्रात गेल्या तुलनेत मतदानाची टक्केवारी सर्वाधिक वाढली.
मागील वेळी १५ लाख ८० हजार ९३३पैकी ७ लाख ३० हजार ८८२ मतदान झाले होते. या वेळेस १६ लाख ९ हजार ३५० मतदार असून, पैकी १० लाख ६५ हजार ४४३ मतदान झाले. मागील तुलनेत या वेळी २ लाख ६८ हजार ४३१ मतदान अधिक झाले. मागील वेळेस जालना विधानसभा क्षेत्रात १ लाख ४ हजार ३१८ मतदान झाले. या वेळेस हा आकडा १ लाख ५३ हजार १०१ असून, गेल्या वेळेपेक्षा हे मतदान ४८ हजार ७८३ अधिक आहे. सिल्लोडमध्ये मागील तुलनेत ४७ हजार ९२४ अधिक मतदान झाले.
भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांचा प्रभाव असलेल्या भोकरदन विधानसभा क्षेत्रात मागील निवडणुकीप्रमाणेच या वेळीही सर्वाधिक मतदान झाले. भोकरदनमध्ये १ लाख ८० हजार ४४ मतदान झाले. त्याचा लाभ दानवे यांना किती होईल, या बाबत तर्क-लढविले जात आहेत. भोकरदनमध्ये सर्वाधिक मतदान झाले असले, तरी मतदानाची टक्केवारी गेल्या तुलनेत ६.४९ टक्के एवढीच वाढली. गेल्या वेळेस भोकरदनमध्ये दानवे यांना ४ हजार १५४ मताधिक्य होते. विधानसभेच्या सलग ३ निवडणुकांत भोकरदनमध्ये भाजपचा राष्ट्रवादीकडून पराभव झाला. या पाश्र्वभूमीवर या वेळी दानवे यांनी भोकरदनवर अधिक लक्ष केंद्रीत केले होते, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही दानवे यांच्याविरुद्ध वैयक्तीक आरोपांची राळ उडविली होती.
बदनापूर विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे असून दानवे यांचे कार्यकर्तेही या भागात मोठय़ा संख्येने आहेत. गेल्या निवडणुकीत दानवे यांना या विधानसभा क्षेत्रात ६ हजार ६८ मताधिक्य होते. या वेळेस येथे ५.५ टक्के मतदान वाढले. मागील लोकसभा निवडणुकीत पैठण विधानसभा क्षेत्रात दानवेंना १ हजार १४७ मताधिक्य होते. या वेळी पैठणच्या मतदानात मागील तुलनेत ११.३६ टक्के मतदान वाढले. बदनापूरमध्ये दानवे यांना मताधिक्याची शक्यता वर्तविली जात असली, तरी पैठणबद्दल मात्र राजकीय वर्तुळात सावधपणे बोलले जात आहे.
मागील निवडणुकीत फुलंब्री विधानसभा क्षेत्रात दानवेंना १३ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य होते. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे व त्यांच्या समर्थकांनी या भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले, तसेच दानवे यांनीही नवीन राजकीय जुळवा-जुळव केली होती. फुलंब्रीत मागील तुलनेत ११.६३ टक्के मतदान वाढले. त्यामुळे फुलंब्रीत मताधिक्य कोणाला, हा चर्चेचा विषय आहे.
मागील निवडणुकीत जालना व सिल्लोड या दोन विधानसभा क्षेत्रांतच काँग्रेसला मताधिक्य होते. या वेळचे वैशिष्टय़ म्हणजे मतांची टक्केवारी वाढण्यात जालना विधानसभा मतदारसंघ प्रथम क्रमांकावर (१३.०८) व सिल्लोड (१२.६६) दुसऱ्या क्रमांकावर आहे. औताडे समर्थकांना या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मागील वेळेपेक्षा या वेळी अधिक अपेक्षा आहे.