दोन समांतर अभ्यासक्रमांच्या कोंडीत सापडलेल्या तरुणाचा भेदक प्रश्न!

‘काय करू या पदवीचे?’ वर्धा येथे व्यवसाय प्रशासन स्नातक ही पदवी घेतलेला तरुण प्रकाश अशोक चनखोरेचा प्रश्न शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा. त्याच्या पदवीच्या कंसात ‘वाणिज्य विद्याशाखा’ असा शब्दप्रयोग. या शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर त्याला वाणिज्य पदव्युत्तर होण्याची संधी आहे. मात्र, ‘वाणिज्य पदवीधर’ या शैक्षणिक अर्हतेवर उमेदवारी मात्र दाखल करता आली नाही. नगरपरिषद संचालनालयाच्या वतीने ७ एप्रिल रोजी निघालेल्या लेखाधिकारी व लेखापरीक्षकांच्या जागेसाठी त्याला उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता. पण तसे होऊ शकणार नाही, असे त्याला तोंडी सांगण्यात आले. मोठी कोंडी झाली त्याची. पदवी घेऊन सात वष्रे उलटून गेल्यानंतरही त्याने घेतलेल्या पदवीसाठी सरकारी खात्यात ना जागा निर्माण झाली ना भरती. त्यामुळेच त्याचा प्रश्न भेदक आहे.

प्रकाश चनखोरे मूळचा बुलढाणा जिल्हय़ातील मेहकर तालुक्यातील बोरी गावचा. वडील शेती करणारे. दोन बहिणी. एकीचे लग्न झालेले, एकीचे बाकी. सारा संसार वडिलांकडे असणाऱ्या पाच एकर शेतीवर चालणारा. प्रकाश औरंगाबादला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला म्हणून आला. काही दिवस कॉलसेंटरला नोकरी केली. आता स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचत राहतो . आता घरातून पैसे मागविणे शक्य नसल्याचे सांगतो. मित्रांकडे उधारी करून झाली आहे.  त्याने पदवीची कागदपत्रे शिस्तीत जपून ठेवले आहेत. कोठेतरी नोकरी मिळेल, या आशेवर नगर परिषद संचालनालयातील जागांसाठी अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर गेला. तेव्हा कळाले, ‘आपल्याकडील पदवीच्या आधारे ‘एम.कॉम’ प्रवेश मिळविता येतो. पण वाणिज्य पदवीधर म्हणून उमेदवारी दाखल करता येत नाही. मग सरकारी बाबूंना त्याने दूरध्वनी केले. मिळणाऱ्या उत्तराचा साचा नेहमीचा, उडवाउडवीचा!

व्यवसाय प्रशासन स्नातक ही पदवी आणि बी.कॉम या दोन्ही पदव्या वेगवेगळय़ा. त्यामुळे एका पदाची अर्हता दुसऱ्या पदवीला मिळणे अवघडच. पण मग असे असेल तर व्यवसाय प्रशासन स्नातक या पदवीच्या आधारे एम.कॉमला प्रवेश कसा मिळतो, असा प्रकाशचा सवाल. नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या दोन्ही पदव्या जणू सारख्याच आहेत, अशा पद्धतीने प्रवेशपात्रता ठरविण्यात आली आहे. म्हणजे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांस ‘एम.कॉम’ला  प्रवेश घेता येतो. प्रकाश चनखोरे याने मात्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. कारण मूळ विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी पुरेसे पैसेच नव्हते. जगण्यासाठी लागणारे पैसे कमवायचे की,  वडिलांच्या पैशावर स्पर्धापरीक्षा द्यायची या विचित्र कोंडीत तो सापडला आहे. अलीकडेच न्यायालयात शिपाई पदासाठीची जाहिरात निघाली होती. त्यालाही अर्ज करायला निघाला होता गडी. पण या भरतीलाही स्थगिती आली. वय वाढत चालले आहे. वयाच्या ३१ वर्षी शिकून काय उपयोग, असा त्याचा प्रश्न आहे. म्हणून तो विचारत असलेला प्रश्न भेदक आहे-‘या पदवीचे करू तरी काय?’

नुसते शिकायचेच का?

नवीन अभ्यासक्रम विद्यापीठातून तयार झाला की तो उत्तीर्ण करणाऱ्याला मोठी मागणी असते असे सांगितले जाते. मधला काळ ‘डी.एड’चा  होता. ते शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत गावोगावी. मग एक काळ संगणक अभ्यासक्रमांचा आला. त्यातही विद्यार्थी तरबेज  झाले. त्या अभ्यासक्रमावरही हजारो रुपये खर्च झाले. मग मॅनेजमेंटचा काळ आला. तेव्हा  ‘बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ करण्याची हवा आली. अनेकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नेहमीचे पदवीधारक त्यात नवीन अभ्यासक्रम करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. पण नोकरी काही मिळाली नाही. याच दुष्टचक्रात अडकलेला प्रकाश आता एका अंधाऱ्या गुहेत नोकरीसाठी चाचपडतो आहे. अशी अवस्था अनेकांची आहे. शेतीत राबणाऱ्या बापाकडून पैसे मागवायचे आणि शिकत रहायचे? किती दिवस काय माहीत.