रयतेचे कल्याणकारी राज्य संकल्पनेला सुरुंग लावण्याचे काम गेल्या पाच वर्षांत झाले आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेची परिस्थिती बिकट आहे. महागाईचा भडका उडाला आहे. जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. देशाच्या स्वायत्त संस्थांवर घाला घातला जात आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला एकाधिकारशाहीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे जनता कदापी सहन करणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. ते रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

नुसता महाराजांचा आशीर्वाद म्हणून चालत नाही. तर त्यांचा विचार आचरणात आणावा लागतो. आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे जनतेनी खासदार निवडून द्यायचा असतो. खासदार त्यांचा पंतप्रधान निवडत असतात. मात्र २०१४ च्या निवडणुकीत देशात अध्यक्षीय लोकशाहीचा आभास निर्माण केला, पंतप्रधान पदाचा उमेदवार आपण निवडून देत असल्याचा गरसमज मतदारांमध्ये निर्माण केला गेला. जनतेने खासदार निवडून द्यायचा असतो जो आपल्या विभागातील प्रश्न संसदेत मांडतो. हा फरक मतदारांनी लक्षात घेतला पाहिजे. ही निवडणूक जनतेची आहे. जनता त्यांचा उमेदवार निवडून देईल, असा विश्वासही डॉ. कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

एक घर सोडून दुसऱ्या घरात गेलं म्हणून जुन्या घराला नाव ठेवायची नसतात. ती आपली परंपरा नाही. शिवसैनिकांनी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यांचा मी ऋणी आहेच. पण देशाच्या एकूण परिस्थितीचा विचार करून मी माझी वाटचाल करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही कोल्हे यावेळी म्हणाले.