ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा राजकीय होता. तथापि, हैदराबाद संस्थानातील निजामविरुद्धच्या लढय़ाला राजकीय, धार्मिक, सामाजिक असे अनेक कंगोरे होते. या लढय़ाचे समग्र इतिहास लेखन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्धन वाघमारे यांनी केले.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. भगवानराव देशपांडे, लक्ष्मीनारायण जैस्वाल, सुधाकर देशमुख आजेगावकर व चंदाताई जरीवाला उपस्थित होते. डॉ. वाघमारे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढय़ावर मोठय़ा प्रमाणात लेखन झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामावर व्यापक व तटस्थ लेखन होणे गरजेचे आहे. तेलंगण, गुलबर्गा व मराठवाडा अशा ३  वेगवेगळ्या भाषिक समूहांवर निजामाची राजवट होती. तब्बल २२५ वर्षे या १८ जिल्ह्य़ांवर निजामाने जुलमी कारभार केला. मराठवाडा तब्बल ७०० वर्षे गुलामगिरीत होता. ऐतिहासिक-सांस्कृतिक असा मोठा वारसा लाभलेल्या मराठवाडय़ात स्वातंत्र्यसैनिकांनी या लढय़ात सक्रिय सहभाग घेतला. या लढय़ाला स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखे धर्मनिरपेक्ष नेतृत्व लाभले. त्यामुळे हा लढा सर्वसमावेशक होता. या लढय़ावर व्यापक लेखन करण्याचा प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने केला. आपल्या कुलगुरूपदाच्या काळात दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. आणखी मोठे लेखन होणे गरजेचे आहे. गोविंदभाई श्रॉफ यांनी स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या अभ्यासातूनही मोठे साहित्य उपलब्ध करून ठेवले आहे, याचा वापर करून समग्र इतिहास लेखन व्हावे, असेही डॉ. वाघमारे म्हणाले.
‘इतिहास नव्या पिढीसमोर यावा’
मुक्तिसंग्रामाचा इतिहास युवा पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांत या लढय़ाबद्दल काही मंडळी अत्यंत बेजबाबदार विधाने करीत आहेत. ‘तेलंगणा व्हाईस’च्या कॅप्टन रेड्डी यांनी बेछूट विधाने केली आहेत. अशा लोकांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. मुक्तिसंग्रामावर नांदेड, औरंगाबाद, हैदराबाद व गुलबर्गा या चारही ठिकाणच्या विद्यापीठांनी एकत्रित येऊन मोठा प्रकल्प हाती घ्यावा, अशी अपेक्षाही अॅड. देशपांडे यांनी व्यक्त केली. हैदराबाद मुक्तिसंग्रामावर समग्र इतिहास लेखन हाती घेण्यात येईल व पुढील वर्षी याच दिवशी पहिला खंड प्रकाशित करू, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.