कविता महाजन या मराठीतील प्रतिथयश लेखिका आहेत. त्यांची पुस्तके, त्यांची फेसबुकवर येणारी मते ही त्यांच्या विचारांचा आरसा आहेत. सध्याच्या घडीला त्यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. ज्यामध्ये कविता महाजन यांनी प्रकाशक कसे चुकीच्या पद्धतीने वागतात. पायाभूत संकेतही कसे सोयीस्करपणे विसरतात याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. प्रकाशकांना लेखकांच्या कष्टांची जाणीव नसते. पुस्तके कोणाकडे छापायला देण्यापेक्षा ती इंटरनेटवर प्रसिद्ध करावीत असे वाटते. प्रकाशकांचे वागणे उबग आणणारे, अपमानास्पद आणि लाजीरवाणे आहे अशी टीका कविता महाजन यांनी फेसबुक पोस्टमध्ये केली आहे.

कविता महाजन यांनी पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे?

आपल्याकडे प्रकाशकांना किमान प्रोटोकॉल पाळता येत नाहीत. तोंडी दिलेले शब्द पाळले जात नाहीत, म्हणून लेखी कागदपत्रं करावीत, तरी तेही काहीजण सोयीस्कर विसरतात. ( एका प्रकाशकाकडे दहा पुस्तकांचा संच चार वर्षं पेंडिंग आहे. दुसऱ्याकडे दोन पुस्तकं आणि अजून दोघांकडे एकेक पुस्तक पेंडिंग आहे. काही गणितंच कळत नाहीत यांची. स्पष्ट सांगावं, तर तेही यांना जमत नाही. )

मी लिहिते ते माझी बौद्धिक-मानसिक गरज म्हणून; संपादनं वगैरे करते ते निव्वळ वाड्मयीन खाज म्हणून. यात वेळ, पैसा, तासन् तास बैठक मारून लिहीत बसण्याचे शारीरिक कष्ट, बाकी सगळे वैयक्तिक प्राधान्यक्रम बाजूला सारून लिहिणं सगळ्या कामांच्या डोक्यावर आणून ठेवणं… किती गुंतवणुकी असतात… आणि या लोकांना लेखकाच्या कष्टांची, गुंतवणुकीची जाणीवच नसते की तुमची पुस्तकं छापतो आहोत म्हणजे उपकार करतोय असा भाव असतो?
या सगळ्या गोष्टी हळूहळू तडजोडी कराव्या वाटण्याच्या पलीकडे चालल्या आहेत. यापुढे कुणाही प्रकाशकांकडे पुस्तकं छापायला देण्यापेक्षा थेट नेटवर आपली आपण प्रकाशित करावीत असं वाटतंय. कारण लिहिण्याची इतकी सवय झाली की, न लिहिता तर जगता येणार नाही आता.

आणि कामच करायचंय तर शांतपणे एखादं पाळणाघर चालवावं. अगदी छोट्या बाळांना देखील मी उत्तम सांभाळू शकते. कोऱ्या पुस्तकाच्या वासाहून बाळाच्या कोवळ्या जावळाचा वास जास्त जिवंत असतो. आपल्या देशात या कामांना नीट प्रशिक्षण दिलं जात नाही आणि प्रतिष्ठा तर मुळीच नसते, हे मुद्दे खड्ड्यात जाऊ देत. तिथं चार नोकरदार आया माझ्यामुळे निश्चिंत कामावर जातील, हे पुरे. हे केवळ उबग आणणारं वा अपमानास्पद नव्हे, लाजीरवाणं देखील आहे… याची जाणीव आपल्या प्रकाशकांना कधी होईल?