सांगली शासकीय रूग्णालयाचा पराक्रम

सांगली : रुग्ण जिवंत असताना तो मृत असल्याचे सांगत भलताच मृतदेह ताब्यात देण्याची घटना सांगली शासकीय रूग्णालयात मंगळवारी पहाटे घडली. या सर्व प्रकारात संबंधित व्यक्ती मृत झाल्याचे कळवल्यामुळे बसलेला धक्का, नंतर कपडय़ात गुंडाळून दिलेल्या मृतदेहाची सांगली ते तासगाव आणि पुन्हा सांगली अशी ने-आण आणि जिवंत व्यक्ती मृत दाखवल्याने झालेला मनस्ताप या साऱ्यांमुळे या रुग्णालयाचा कारभार चव्हाटय़ावर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत संबंधित दोषींवर २४ तासाच्या आत कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तासगावमधील अविनाश उर्फ चिलू दादासो बागवडे (वय ५५) यांना उपचारासाठी सांगलीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ८ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा आज पहाटे अडीच वाजता मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचा मृतदेह ताब्यात घ्यावा असे रूग्णालयातून नातेवाइकांना सांगण्यात आले.

त्यानुसार अविनाश यांचे नातेवाईक रुग्णालयात मृतदेह घेण्यासाठी आले. त्या वेळी अर्धवट झाकलेला हा मृतदेह अविनाशचा नसल्याचे नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनास सांगितले. रुग्णालय प्रशासनाने मात्र हा मृतदेह अविनाशचाच असल्याचे सांगत तो घेऊन जाण्यास सांगितले. याचवेळी त्यांना रूग्णाचा मृत्यू दाखलाही देण्यात आला. अखेर नातेवाइकांनी नाइलाजास्तव हा अनोळखी मृतदेह अविनाशचा समज करून घेत घरी नेला.

दरम्यान घरी मृतदेह नेल्यानंतर नातेवाईक जमले. या वेळी अंत्यदर्शन घेताना प्रत्येक जण हा अविनाश नसल्याचे सांगू लागला. मात्र, सोबत देण्यात आलेला मृत्यू दाखला अविनाशच मृत झाल्याचे सांगत होता. यामुळे उपस्थित सारेच जण बुचकळ्यात पडले. हा मृतदेह कुणाचा आणि मग अविनाशचे नेमके काय झाले असा प्रश्न नातेवाइकांना पडला. याबाबत पुन्हा रुग्णालयात विचारणा, शोधाशोध सुरू झाल्यावर मृत घोषित केलेले अविनाश जिवंत असल्याचे समोर आले. या उलगडय़ामुळे सगळे नातेवाईक संतप्त झाले. सांगलीहून तासगावला नेलेला मृतदेह परत सांगलीला आणण्यात आला. या गोंधळामुळे बागवडे यांच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. हा अनोळखी मृतदेह कोणाचा याचे उत्तर रूग्णालय प्रशासन मंगळवारी सायंकाळपर्यंत शोधत होते.

दोषींवर कारवाई- सापळे

रूग्ण जिवंत असूनही त्याच नावाने चुकीचा मृतदेह देण्याचा प्रकार अक्षम्य असून याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित दोषींवर २४ तासाच्या आत कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.