सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून फाशीवर शिक्कामोर्तब केले असले तरी फाशी टाळण्यासाठी याकुब व त्याचे वकील राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. याकुब व त्याच्या वकिलांमध्ये मंगळवारी पुन्हा चर्चा झाली.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील फाशीची शिक्षा सुनावलेला याकुब मेमनने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका केली होती. आज न्यायालयाने ती पुन्हा फेटाळून लावली. याकुब सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. आज सकाळी त्याचे दिल्लीतील वकील शुबेल फारुक व स्थानिक वकील अनिल गेडाम या दोघांनी कारागृहात जाऊन याकुबची भेट घेतली. याकुबच्या विनंतीवरून विशेष अतिथी कक्षात तो व दोघे वकील, असे तिघेच उपस्थित होते. त्यांची सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. दरम्यान, फाशी टाळण्यासाठी याकुब व त्याचे वकील हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहेत. याआधी याकुबच्या नातेवाईकाने याकुबच्या फाशीविरोधात राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज फेटाळण्यात आला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा त्याची
पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी याकुब अद्यापही न्यायालयीन लढा लढण्याच्या तयारीत आहे. त्याच विषयावर आज त्याने वकिलांशी चर्चा केली असण्याची शक्यता आहे. यापूर्वी नातेवाईकाने
दयेचा अर्ज केला असला तरी आता त्याला स्वत: दयेचा अर्ज करण्याचा अधिकार असून तो राष्ट्रपतींकडे तसा अर्ज करणार असल्याचे हे द्योतक आहे.