यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना विविध स्तरावर मदत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांना लवकरच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे दिली.
यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत अंबाजोगाई येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींचा मेळावा घेऊन त्यांच्या समस्या सुळे यांनी जाणून घेतल्या.
या महिलांच्या मुलींचे शिक्षण, लग्न तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी शिक्षण घेऊ इच्छित असतील, तर त्यांचे उच्च शिक्षण करण्याची जबाबदारी अभियानातर्फे घेण्यात येणार आहे.
मुलांचे शिक्षण व आरोग्यविषयक सुविधांसाठीही संबंधित कुटुंबांना मदत केली जाणार आहे. खासदार सुळे लवकरच नांदेडचा दौरा करून दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांशी संवाद साधणार आहेत, असेही वाघ यांनी सांगितले.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर व ग्रामीण विभागाची बठक पार पडली. या बठकीत नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून प्रांजली रावणगावकर, तर शहर जिल्हाध्यक्षपदी कृष्णा मंगनाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
माजी जिल्हाध्यक्ष कल्पना डोंगळीकर यांची प्रदेश चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, कार्याध्यक्ष जीवन पाटील घोंगरे, सरचिटणीस रामनारायण बंग, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस गणेश तादलापूरकर, मनपा गटनेत्या डॉ. शीला कदम, माजी मनपा सभापती सविता कंठेवाड आदींची उपस्थिती होती.