News Flash

.. तर काँग्रेस आमदारांचे अपहरण झाले असते!

कर्नाटकातील घटनाक्रमाबाबत आमदार यशोमती ठाकूर यांचा दावा

कर्नाटकातील घटनाक्रमाबाबत आमदार यशोमती ठाकूर यांचा दावा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्याने सैरभर झालेल्या भाजपच्या नेत्यांनी कसेही करून बहुमताचा आकडा जुटवण्यासाठी आपली सारी शक्ती पणाला लावली होती. आम्ही बंगळुरूहून आमदारांना घेऊन कोचीला जाणार होतो, परंतु कोचीला जाणारे विमान केंद्र सरकारने रद्द केले. आम्हाला बंगळुरूमध्येच अडकवण्याचा प्रयत्न झाला. हा डाव लक्षात येताच आम्ही तातडीने विमानाऐवजी बसने हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घ्यायला थोडा जरी उशीर झाला असता तर आमच्या काही आमदारांचे अपहरण झाले असते, अशा शब्दात काँग्रेसच्या ‘मिशन सेव्ह डेमॉक्रसी’च्या चमूमधील  आमदार यशोमती ठाकूर यांनी कर्नाटकातील थरार विशद केला.

लोकसत्ताला दिलेल्या खास मुलाखतीत यशोमती ठाकूर यांनी या शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सत्तेच्या खेळातील अनेक अस्पर्शित पैलू उलगडले. त्या म्हणाल्या, कर्नाटकातील मतमोजणीच्या दोन दिवसांपासूनच काँग्रेसची एक चमू सक्रिया झाली होती. जद(एस)सोबत बोलणे सुरू होते.  ही चमू निर्णय घेत होती, त्याला पक्षश्रेष्ठी सकारात्मक प्रतिसाद देत होते, परंतु ऐनवेळी आमदारांना दुसऱ्या शहरात हलवण्याची वेळ येऊन ठेपली. आम्ही हैदराबादला पोहोचलो. येथेही हॉटेलमध्ये आमदारांना भाजपकडून फोन येते. आमिष दिले जात आणि धमक्यादेखील दिल्या जात होत्या. आम्ही आमदारांना फोन घ्या, पण ते रेकॉर्ड करा, अशा सूचना दिल्या होत्या.

दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने २४ तासांत बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे पुन्हा रात्रीचे जेवण करून बसने बंगळुरूकडे निघालो. विमानाने परत जाण्याचा विचार केला होता, परंतु केंद्र सरकारकडून विमान दुसरीकडे वळवले जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

रात्री सातच्या सुमारास हैदराबाद येथून निघालो आणि सकाळी बंगळुरू येथे पोहोचलो. सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिल्याने तीनही बसेसला कडेकोट सुरक्षा होती, परंतु हैदराबादला जाताना सुरक्षा नव्हती, परंतु योग्यवेळी कर्नाटकच्या बाहेर गेल्याने भाजपच्या हाती काही लागले नाही, असा दावाही त्यांनी केला.

हैदराबादेतही भाजपचे गुप्तहेर

येडियुरप्पा यांना राज्यपालांनी शपथ दिली आणि दुसऱ्या मिनिटाला आमदारांची सुरक्षा काढण्यात आली. आमदारांचे अपहरण करण्याचे भाजप आणि येडियुरप्पा यांचा प्रयत्न होता, परंतु ते काही करण्यापूर्वी बसने आम्ही कर्नाटकची सीमा ओलांडली होती. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हैदराबाद येथे पोहोचलो. भाजपने येथे देखील गुप्तहेर ठेवले होते. आम्ही त्या गुप्तहेरला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.

कपडे बदलण्याठी गेलेले आमदार परतलेच नाहीत

हैदराबादकडे निघण्यापूर्वी पक्षाच्या कार्यालयात आमदार गोळा झाले होते. कपडे बदलण्याठी जातो म्हणून आमदार प्रसाद गौडा आणि आनंदसिंग गेले होते. भाजपने त्यांचे अपहरण केले. त्यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली. गुरुवारी रात्री बंगळुरूहून हैदराबाद आणि शुक्रवारी रात्री हैदराबादहून बंगळुरू असा आमदारांनी प्रवास केला. यादरम्यान भाजपकडून प्रलोभन देण्यात आले. धमक्या देण्यात आल्या, परंतु आमदार त्यांना बधले नाहीत, असेही ठाकूर म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2018 1:15 am

Web Title: yashomati thakur comment on bjp
Next Stories
1 …तर शिवसेनेत मोठी फूट पडेल, रामदास आठवलेंचा इशारा
2 संविधानाला धक्का लावल्यास भाजपाची साथ सोडू
3 रेल्वे फलाटावर प्रवाशांची घसरगुंडी ; ‘मिस्टिंग सिस्टम’मधून पाणी गळती
Just Now!
X