News Flash

“गौरी ज्या कारणाने तू आत्महत्या केलीस त्याला शिक्षा मिळेल, रक्ताचा असला तरी,” प्रशांत गडाख यांची भावूक पोस्ट

प्रशांत गडाख यांच्या भावनांचा बांध फुटला

माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी आत्महत्या केल्याने कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. गौरी या लोणी येथील वसंतराव विखे यांच्या कन्या होत्या. यासोबतच यशवंत प्रतिष्ठानच्या कार्यात त्या सक्रिय होत्या.

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या गौरी या भावजय, तर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी होत्या. दरम्यान गौरी गडाख यांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी प्रशांत गडाख यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. “ज्या कारणाने तू आत्महत्येचा निर्णय घेतला असशील, त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी, हा मला आत्मविश्वास आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलं आहे –
माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात. त्यात राजकीय विरोध असणारे पण वेदना जाणारेही होते.परंतु माझी मनस्थिती तेंव्हा कुणालाही भेटण्याची नव्हती.त्याबद्दल सॉरी…

माझी स्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल. नियतीने माझ्या वाट्याला मरुस्तपर्यंत जे वेदनेचं गाठोड दिलं आहे, ते मला घेऊनच चालावं लागेल. ‘वर्तमान जगायचंय मला’ ही माझी कविता जी इतरांना प्रेरणा होती ती अशा रीतीने माझीच प्रेरणा होऊन बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. राजकारणात, समाजकारणात, स्वतःच्या आयुष्यात यश-अपयश, कठीण प्रसंग खुप आले पण मी कधीही डगमगलो नाही. उलट त्यांना खंबीरपणे तोंड दिलं, लढलो…

गळफास घेतल्याने गौरी गडाख यांचा मृत्यू

पण… गौरी तु मला हरवलं… माझा स्वभाव आलेल्या परिस्थितीशी लढण्याचा आहे, आता कुणाशी लढू..तु माझी पत्नी नव्हती तर आई, बहीण, मैत्रीण सगळं काही होती असं तुच मला म्हणायचीस ना.. तशीही तु मुडी होतीस, कधीकधी अचानक शांत राहायचीसं.. तु चेष्टेत मला म्हणायची कि, ‘तुमच्याआधी मीच जाणार’ पण तु अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली. साहेबांची सगळ्यात आवडती सुन नाही तर तु मुलगी, आपल्या नेहल, दुर्वा आणि मी .. आमचं काय चुकलं गं.. रोज रात्री झोपताना असं तुझ्याशी भांडतो मी.. माझा आवाज पोहोचतो का गं तुझ्यापर्यंत.. मला कोणाचीही सहानुभूती नको आहे पण एक नक्की की माझा नियतीवर भरवसा आहे. ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी.. हा मला आत्मविश्वास आहे.

गौरी मी घरी नव्हतो, तु निष्प्राण..आपल्या लहान मुलीने पाहिलं गं खिडकीतुन.. गौरी,तुला मी नेहमी म्हणायचो की, मी आहे तुझ्यामागे…मी आता खरंच फकीर झालोय पण मला माझ्यासमोर माझ्या मुली, माझे वडील, माझ्यावर अवलंबून हजारो संसार दिसतात.

माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात….

Posted by Prashant Gadakh on Wednesday, 30 December 2020

मित्रांनो मी जरी तुमच्यात आलो तरी ही घटना मला एक दोन महिन्यात सावरू शकत नाही. प्लीज, माझी भावना तुम्ही समजून घ्याल. मी स्वतःहुन ठामपणे सांगायचो की, मी राजकारणात येणार नाही पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, आता काळच ठरवेल की मी राजकारणात यायचं कि नाही. पण माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं ते मी माझ्या आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात माझ्या दोन्ही मुली, माझे आई-वडील आणि तुम्ही सर्व जिवलग मित्र आहात.आपण भेटु, तेव्हा कृपा करून, माझं सांत्वन करू नका, न विसरता येणारी ती घटना मला निदान तुमच्यात असताना विसरायची आहे. जेव्हा भेटु तेंव्हा तुमचे काम सांगा, समाजाची कामे सांगा, नवनिर्मितीची चर्चा करा.तुमच्याशी व्यक्त व्हावसं वाटलं म्हणुन हात मोकळा झाला आणि माझं मनही…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 3:37 pm

Web Title: yashwant pratishthan prashant gadakh facebook post over wife gauri gadakh suicide sgy 87
Next Stories
1 ..विचार करा करोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम केलं असतं तर ?-उद्धव ठाकरे
2 “फडणवीस दुकान बंद होऊ नये म्हणून टीका करत असतात”
3 औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’- फडणवीस
Just Now!
X