कोपर्डीतील पीडित कुटुंबाला आधार

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील पीडित कुटुंबातील मोठय़ा मुलीचे शैक्षणिक पालकत्व सोनई (नेवासे) येथील सामाजिक प्रतिष्ठानने घेतले आहे. या मुलीच्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली. राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी कोपर्डी येते संस्थेचे शिष्टमंडळ पाठवले होते. या पदाधिकाऱ्यांनी कोपर्डी येथील या पिडीत कुटुंबांची भेट घेऊन या कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली.

यातील मोठय़ा मुलीच्या शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची तयारी संस्थेने यावेळी दर्शवली. त्याला कुटुंबियांनी संमती दर्शवताच या मुलीच्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची जबाबदारी संस्थेने स्वीकारली. शरद कुदांडे, अन्वर सय्यद, उदय पालवे, राजेंद्र भालेराव, दादासाहेब वैरागर, नितीन दरंदले आदी यावेळी उपस्थित होते.

गडाख यांनी सांगितले की, कोपर्डीतील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र पीडित  कुटुंबातील एकाचे शैक्षणि पालकत्व स्विकारताना संस्थेची मदतीची भावना नाही.

अशा घटनांमध्ये पीडित कुटुंबाच्या पाठीशी समाज संघटितपणे उभा राहतो, याच भावनेने ही निर्णय घेण्यात आला आहे. गाव दत्तक योजना, साधा विवाह सोहळा, गाव तिथे वाचनालय, गरजू मुलींचे शैक्षणिक पालकत्व, नेत्रदान संकल्प आदी सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात.  नेत्रदान उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत तब्बल ६०० जणांना दृष्टी प्राप्त झाली आहे, अशी माहिती गडाख यांनी दिली.