राजापूर तालुक्यातील नाटे या जैतापूर खाडीलगत वसलेल्या गावात सोळाव्या शतकात उभारलेल्या शिवकालीन यशवंतगडाची विक्री झाल्याचे उघड होताच शिवप्रेमिकांमध्ये संतापाची लाट पसरली आणि निद्रावस्थेत असलेल्या शासकीय यंत्रणेला जाग आली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी किल्ले यशवंतगडाच्या विक्रीबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर त्याच वेळी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सन १९६१ च्या नियमानुसार हा गड पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शिवकालीन किल्ले यशवंतगड हा नाटे, तालुका-राजापूर येथे विजापूरच्या आदिलशहाने उभारलेला असून, छत्रपती शिवरायांनी त्याची डागडुजी करून तो सुस्थितीत आणला होता. महसूल खात्याच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार या गडाची मालकी विश्वनाथ रघुनाथ पत्की यांची असून त्यांनी हा गड ९९ वर्षांच्या कराराने आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर व त्यांची पत्नी अनिता अरिवद पारकर यांना २०१२ साली ३५ लाखाला विक्री केल्याचे जैतापूर परिसरातील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबईत वास्तव्याला असलेले समीर शिरवडकर यांनी माहितीचा अधिकार कायद्याखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे उघडकीस आणले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच शिवप्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आणि शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
समीर शिरवडकर यांनी माहितीचा अधिकार कायद्याखाली मिळविलेल्या माहितीनुसार १८ ऑक्टोबर २०१२ रोजी हा किल्ला यशवंतगड ३५ लाखाला ९९ वर्षांच्या कराराने आंबोळगड येथील पारकर दाम्पत्याला विकल्याचे उघड होते. गडकिल्ल्याची डागडुजी करून ते सुस्थितीत जतन करून ठेवण्याऐवजी ते विकले जाऊ लागले तर पुढील पिढीपुढे आपल्या पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा काय ठेवायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत रत्नागिरीतील पुरातत्त्व खात्याचे अधिकारी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘एखाद्या गडाची मालकी खासगी व्यक्तीकडे असेल आणि तो त्याने विकला असला तरी पुरातत्त्व खात्याच्या १९६१च्या नियमानुसार हा गड शासन पुन्हा ताब्यात घेऊ शकते. यशवंतगडाच्या बाबतीतही आम्ही याच पद्धतीने प्रयत्न सुरू करीत आहोत,’’ असे त्यांनी सांगितले.हर्णे गावी गोवा नावाने ओळखला जाणारा एक किल्ला होता. त्याचीही अशाच प्रकारे विक्री झाल्याचे शासनाला समजताच शासनाने अधिसूचना काढून तो आपल्या ताब्यात घेतल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे यशवंतगडाची विक्री झाली असली तरी तो ताब्यात घेण्यात कोणतीही अडचण नाही. शासनाने अधिसूचना काढून हा गड पुन्हा ताब्यात घ्यावा यासाठी आमचे निकराचे प्रयत्न सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, किल्ले यशवंतगडाची विक्री झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिला असून, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.