सध्या उन्हाळ्यात विवाह समारंभांमुळे परिवहन मंडळाच्या बसेसवर प्रवाशांची गर्दी दररोज वाढलेली दिसते. अशा उत्पन्नाच्या काळात प्रवाशांना उपकारक ठरलेल्या यशवंती गाडीच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की बसस्थानक प्रमुखांवर आली असून त्या फेऱ्यांतून होणारे उत्पन्नही मंडळाच्या हातातून गेले आहे. कारण, बस सुरू करण्याच्या किल्ल्या हरवलेल्या आहेत.
येथील मध्यवर्ती बसस्थानकावरून अनेक बसेसच्या फेऱ्या आहेत. त्यात यशवंती ही बस प्रवाशांना चांगलीच उपकारक ठरत आहे. तशीत ती परिवहन मंडळासाठीही उत्पन्नाची चांगली बाब आहे. खासगी प्रवासी वाहनांना तोंड देण्यासाठी ही बस उत्तम असतानाही या बसच्या किल्ल्या एकदाच नव्हे, तर चक्क दोनदा हरवितात, हा आश्चर्याचा प्रसंग परिवहन विभागात घडला आहे.
जो चालक या बसवर असेल तो त्या दिवशीच्या फेऱ्या पूर्ण झाल्यावर बसची किल्ली संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करतो. दुसऱ्या दिवशी ही किल्ली नंतर येणाऱ्या चालकाच्या हवाली केली जाते व फेऱ्या सुरू होतात, असे नियोजन असते, पण एकाच आठवडय़ात दोन वेळा यशवंतीच्या किल्ल्या हरविण्याची व तिच्या फेऱ्या रद्द होण्याची वेळ आली आहे. अशाच कारणांमुळे परिवहन महामंडळाचे उत्पन्न कमी होते, पण याची गांभीर्याने दखल घेणत आलेली नाही. चुकून अधिकाऱ्यांनी दखल घेतलीच तर अधिकारी स्वत:ची कातडी वाचवून कर्मचाऱ्याचा बळी देतात, असेही सूत्रांनी सांगितले.

जबाबदारी तिघांची -अनिल सोले
बसची किल्ली नीट सांभाळून ठेवणे व चालकाकडे सोपविण्याची जबाबदारी बसस्थानक प्रमुख, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक व आगार व्यवस्थापकाची असते. हे तिघे यास जबाबदार असतात, असे विभाग नियंत्रक अनिल सोले यांनी सांगितले. या प्रकरणी चौकशी करून कार्यशाळा व्यवस्थापक ज्याला जबाबदार धरतील व त्याबाबतचा जो अहवाल सादर करतील त्यानुसार कारवाई संबंधित अधिकारी करतील, असेही त्यांनी सांगितले.