शवविच्छेदन अहवाल सादर, सोनईत अंत्यसंस्कार

नगर  :  माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख (३५) यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.  गौरी यांच्यावर सोनई ( ता. नगर ) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

काल सायंकाळी  नगर येथील यम्शवंत कॉलनीतील घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. आज त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. चार डॉक्टरांनी गौरी यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला असून गळफास बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या गौरी या भावजय, तर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी होत. त्यांच्यामागे नेहल व दुर्गा या दोन मुली आहेत.  गौरी या लोणी येथील वसंतराव विखे यांच्या कन्या होत. यशवंत प्रतिष्ठानच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या त्या सेवेकरी होत्या.  महिलांविषयक उपक्रमांत त्या कायम आघाडीवर असत. कार्यकर्त्यांंत त्या ‘वहिनी’ या नावाने परिचित होत्या.

आज सायंकाळी सोनई येथे वांबोरीत गौरी गडाख यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले. त्यांना पुतणे उदयन गडाख यांनी अग्नी दिला. या वेळी  मृद आणि जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, डॉ. सुभाष देवढे, प्रशांत गडाख, विजय गडाख, सुनील गडाख, आमदार  संग्राम जगताप , मोनिका राजळे, माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण कडू आदी  उपस्थित होते.

दरम्यान, गौरी गडाख यांच्या आकस्मिक निधनानंतर सोनई गावावर शोककळा पसरली होती. त्यामुळे आठवडी बाजार वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली होती.