दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया घातल्याने देशातील हे सर्वात समृध्द राज्य असून, धोरणात्मक कार्याच्या पाठबळावर दरडोई उत्पन्न वाढवून महाराष्ट्राला उज्वल भविष्य देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मुंबई ते बेंगलोर हा औद्योगिक विकासमार्ग बनवण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळय़ाचे अनावरण, व्हॉटस् अ‍ॅप, एसएमएस, मोबाईल, इंटरनेट अ‍ॅग्री मार्केट व सीसीटीव्ही सिस्टिमचा शुभारंभ, नव्याने आरक्षण लाभलेल्या मराठा व मुस्लिम लाभार्थीना दाखल्यांचे तसेच, शासकीय लाभार्थीना धनादेशांचे वितरण अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. राज्याचे परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे संयोजक कराड बाजार समितीचे सभापती दाजी पवार, विभागीय आयुक्त  प्रभाकर देशमुख यांची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, की सर्वसामान्य कुटुंबातील एखादी व्यक्ती किती मोठे काम करू शकते. याचे यशवंतराव चव्हाण हे मूर्तिमंत उदाहरण असून, चव्हाणसाहेबांनी लोकसंग्रहाबरोबरच ग्रामीणभागातून नेते निर्माण केले. कृषी, औद्योगिक विकासाबरोबरच महाराष्ट्राचा वैचारिक पाया मजबूत करून, हे राज्य सदैव समृध्द राहण्यासाठी खऱ्या अर्थाने चालना दिली. सध्या राज्यातील केवळ १७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून, उर्वरित क्षेत्र पावसावरच अवलंबून आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रातील शेतकरी सहकाराच्या पाठबळावर भक्कम उभा आहे. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने आज महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. गुजरातच्या तुलनेत आपले राज्य कित्येक पटीने विकासाचे टप्पे पूर्ण करीत असून, येथे परकीय गुंतवणूकही सर्वाधिक आहे. तरी, विकासाच्या मुद्दय़ावर आपण आकडेवारी व वस्तुस्थितीवर जाहीर चर्चेस सदैव तयार असल्याचे आव्हान त्यांनी दिले. उत्तरेकडील राज्यांचा विचार करता तेथे ९० ते ९८ टक्क्यांपर्यंतच्या क्षेत्राला पाणी उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे सिंचनक्षेत्र पाहता, हे राज्य नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितही भक्कम उभे आहे. राज्य शासनाने विकासाचा समतोल साधण्याचा सातत्याने प्रयत्न  केला  आहे.
महाराष्ट्राला पाणी टंचाईमुक्त  करण्याचे आव्हान काँग्रेस सरकारने स्वीकारले असून, दुष्काळ पडला तरी, टंचाई निर्माण होणार नाही. हे आपण करू शकतो. असा विश्वास देताना, देशाच्या इतिहासात महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत दुष्काळ निवारणासाठी सर्वाधिक निधी दिला असल्याचा दावा त्यांनी केला. नजीकच्या काळात राबवण्यात आलेली सिमेंट साखळी बंधाऱ्यांची योजना दुष्काळाला संजीवनी देणारी असल्याने ती सर्वत्र राबवण्यास प्राधान्य दिले जाईल. सिमेंट साखळी बंधारे टँकरमुक्त गावांसाठी पर्याय असेल असाही विश्वास त्यांनी दिला. अल्प व्याजदरातील कृषी कर्जामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक ताण कमी झाला आहे. संपूर्ण ऊस क्षेत्र ठिबक करणे तसेच, पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा यासाठी आपण आग्रही असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पाऊस नसला तर काय होईल. याचे गांभीर्य पाण्याने समृध्द असलेल्या जनतेनेही ठेवावे. असे आवाहन त्यांनी केले.
मधुकरराव चव्हाण म्हणाले, की यशवंतराव चव्हाणांनी शेतकऱ्याला कारखानदार व व्यापारी बनवले. त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केल्यानेच आमच्यासारखी शेतकऱ्याची मुले विविध संस्थांचे सभापती, लोकप्रतिनिधी, मंत्री झाले. यशवंतरावांच्या कार्याने अवघा महाराष्ट्र बदलून गेला, भारावून गेल्याचे ते म्हणाले. सध्या निवडणुकीच्या तोंडावर विविध मागण्यांसाठी आंदोलनं सुरू आहेत. मागण्यांचा अधिकार निश्चितच सर्वाना आहे. पण अधिकाराचा अतिरेक होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली.