पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथील सभेत पाणी न मिळाल्याने सातवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. क्षितीजा गुटेवार (वय 12) असे विद्यार्थिनीचे नाव असून आता नेमका दोष कुणाला द्यावा हेच समजत नाही, अशी प्रतिक्रिया तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. क्षितीजाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत डॉक्टरांकडून अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवडा येथील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या महामेळाव्यात उपस्थित होते. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला सकाळी  रिक्षाने गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितीजा, तिची आई सुनीता आणि सात वर्षाचा भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. क्षितीजा ही पांढरकवडा येथील जिल्हा परिषद विद्यालयात सातवीत शिकत होती.

मोदींची सभा सकाळी ११ वाजता सुरु होणार होती. ऊनही खूप होते. अशा परिस्थितीत पाण्याची व्यवस्था नसल्याने सभेत आलेल्या महिलांचे हाल झाले. गर्दी असल्याने आणि पोलिसांनी बाहेर जाण्यास मनाई केल्याने हालात भर पडल्याचे सांगितले जाते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून महिलांना जागीच बसून राहा, असे वारंवार जात होते.

क्षितीजाला तहान लागली होती, पाण्याअभावी तिचा जीव कासावीस झाला होता. वेळीच पाणी न मिळाल्याने क्षितीजाची प्रकृती खालावली. तिला आधी पांढरकवड्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिला यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिथून तिला नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूरमधील डॉक्टरांनी पाण्याअभावी मुलीची प्रकृती खालावली आणि तिचे अवयव निकामी झाल्याचे सांगितले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. बुधवारी सकाळी उपचार सुरू असतानाच क्षितीजाचा मृत्यू झाला.

क्षितीजाला नरेंद्र मोदींच्या महिला मेळाव्यात वेळीच पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे तिची प्रकृती खालावली व त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र यात आता नेमका दोष कुणाला द्यावा हेच समजत नाही, असा सवाल तिचे मामा विनोद पेंटावार यांनी विचारला आहे. क्षितीजा ही मूळची नांदेड जिल्ह्यातील आहे. तिच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर क्षितीजाची आई ही मुलांसह माहेरी पांढरकवडा येथे रहायला आली होती.