करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशिल असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार आज (शनिवार) घडला. येथील आयटीआय कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २० करोनाबाधित रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले. यानंतर प्रशासनाने शोधमोहीम राबवून सापडलेल्या काही रूग्णांना गृहविलगीकरणात ठेवले.

जिल्ह्यात दररोज करोनाबाधितांची संख्या सरासरी एक हजाराने वाढत आहे. आज शनिवारी घाटंजी तालुक्यात ४५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येते. शुक्रवारी तालुक्यातील आमडी येथे कोरोना चाचणी शिबीर घेण्यात आले. या ठिकाणी तब्बल १७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांना घाटंजी येथे आयटीआय कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, आज (शनिवार) या कोविड केअर सेंटरमधून  तब्बल २० करोनाबाधित पळून गेल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालीची जमीन सरकली आहे. या प्रकाराने तालुक्यात संसर्गाचा धोका वाढला आहे.  पलायन केलेले रुग्ण कोणत्या एका गावातील आहेत की, अनेक गावातील हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तालुका आरोग्य यंत्रणेने या रुग्णांचा गावागावात आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी व आशा सेविका यांच्यामार्फत शोध घेणे सुरू केले आहे. पलायन केलेल्यांपैकी सापडलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरची जबाबदारी असलेले आरोग्य अधिकारी डॉ. संजय पुराम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांच्याशी संपर्क साधला असता, घाटंजी येथील कोविड केअर सेंटरमधून २० करोनाबाधितांनी पलायन केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तरी या संदर्भात अधिक माहिती घेणे सुरू असून, याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधितांविरोधात कारवाई : जिल्हाधिकारी
घाटंजी कोविड केअर सेंटरमध्ये घडलेला प्रकार संतापजनक आहे. या पद्धतीने वर्तन राहिल्यास जिल्ह्यात संसर्ग वाढेल. त्यामुळे पळून गेलेल्या रुग्णांविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. याप्रकाराला दोषी असणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचऱ्यांचीही चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.