11 August 2020

News Flash

यवतमाळ : प्रतिबंधित गुटख्यासह ८० लाखांचा साठा ‘बॉयलर’मध्ये नष्ट

अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांचा सहकार्याने विविध ठिकाणी धाडी टाकून हा साठा जप्त केला होता.

यावर्षीच्या सुरूवातीपासून गेल्या तीन महिन्यातील टाळेबंदीदरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्बल ८३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित सुपारी व इतर अन्नसाठा जप्त केला होता. यापैकी ७७ लाख २१ हजार ४८४ रूपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुपारी, अन्नपदार्थ इत्यादी पदार्थांचा साठा आज (गुरूवार) नष्ट करण्यात आला. यासाठी यवतमाळ येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या बॉयलरचा वापर करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांचा सहकार्याने जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत विविध ठिकाणी धाडी टाकून हा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले.

करोना संसर्गाच्या अनुषंगाने जाहीर केलेल्या टाळेबंदी दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट गुटखा, सुगंधित सुपारी मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने विकली जात होती. तसेच या पदार्थांची छुपी वाहतुकही सुरू होती. अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी अनेक ठिकाणी धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात हे पदार्थ जप्त केले. जानेवारीपासून १४ मोठ्या कारवाया करण्यात आल्या, यात टाळेबंदीदरम्यान मार्च ते जून या कालावधीतील ११ कारवायांचा समावेश आहे. दोन मोठ्या कारवाईत आंध्रप्रदेशातून वाहतूक करणाऱ्या दोन् ट्रकसह सुगंधित तंबाखु जप्त करण्यात आला होता. या सर्व कारवायांमध्ये ८३ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. यापैकी ७७ लाख २१ हजार ४८४ रूपयांचा साठा आज नष्ट करण्यात आला.

तीन कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित साठा अनुक्रमे उमरखेड, पुसद आणि यवतमाळ शहर पोलिसांच्या ताब्यात असल्याने हे पदार्थ नष्ट व्हायचे आहेत. यवतमाळचे सहाय्यक आयुक्त (अन्न) कृष्णा जयपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, संदीप सूर्यवंशी तसेच राजेश यादव यांनी ही कारवाई केली. जनतेच्या सुरक्षित आरोग्यासाठी प्रतिबंधित गुटखा, अन्नपदार्थ वापराविरुद्ध धडक मोहीम सतत सुरू राहणार असल्याची माहिती कृष्णा जयपूरकर यांनी ‘लोकसत्ता’स दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 5:16 pm

Web Title: yavatmal 80 lakh stocks including banned gutkha destroyed in boilers msr 87
Next Stories
1 “उद्धव ठाकरेंवर सामनामधूनच टीका करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली”
2 सर्पदंशाने दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत द्या – आमदार प्रतिभा धानोरकर
3 “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?”
Just Now!
X