News Flash

यवतमाळ : मृतदेहाची अदलाबदल झाल्याने संतप्त जमावाकडून खासगी रुग्णालयात तोडफोड!

प्रशासनाच्या वरदहस्तामुळे हॉस्पीटलची मुजोरी वाढल्याचा मृतांच्या नातेवाईकांचा आरोप

यवतमाळ येथील वादग्रस्त ठरलेल्या शहा हॉस्पीटल या खासगी कोविड रूग्णालयात मृतदेहाची अदलाबदल झाल्याने मृत रूग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली. आज (रविवार) सकाळी ११ वाजता घडलेल्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यवतमाळ येथील ॲड.अरुण गजभिये आजारापणामुळे येथील शहा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी सकाळी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह घेऊन सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात पोहोचले. तेथे त्यांनी रॅपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह उघडून बघितला असता तो ॲड.गजभिये यांचा नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.

या प्रकारामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन थेट रूग्णालयात पोहोचले. तेथे त्यांनी हॉस्पीटल व्यवस्थापनास जाब विचारला. मात्र डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नातेवाईकांनी दवाखान्यात तोडफोड सुरू केली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

ॲड. गजभिये यांच्या मृतदेहाऐवजी त्यांच्या नातेवाईकांना आर्णी येथील सेवानिवृत्त सहायक फौजदार दिगांबर शेळके यांचा मृतदेह देण्यात आला. शेळके यांचाही मृत्यू शनिवारी रात्रीच झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यांच्या नातेवाईकांकडून देयकाची रक्कम जमा न केल्याने शेळके यांचा मृतदेह व्यवस्थापनाने दिला नाही, असा आरोप मनिषा दिगांबर शेळके यांनी यावेळी केला. शेळके यांचे कुटुंबीय मृतदेहासाठी रात्रीपासून रुग्णालयात प्रतिक्षेत असताना त्यांचा मृतदेह गजभिये यांच्या नातेवाईकांना देऊन रूग्णालयाने दोन्ही कुटुंबियांची फसवणूक करून मृतांची विटंबना केल्याचा आरोप यावेळी दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी केला.

या घटनेनंतर अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत नातेवाईकांनी रूग्णालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. तर, रूग्णालय व्यवस्थापनाने सावरासावर करून ॲड. गजभिये यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना आपण सुपूर्द केलाच नव्हता, ते परस्परच मृतदेह घेऊन गेल्याने हा गोंधळ झाल्याचा दावा केला आहे. यावरही गजभिये व शेळके या दोन्ही कुटुंबियांनी आक्षेप घेतला. रुग्णालयाने ॲड.गजभिये यांच्या नातेवाईकांना मृतदेह दिला नसेल तर तो त्यांनी कसा नेला? कोणतेही सोपस्कार न करता रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तो कसा नेवू दिला? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. तोडफोड करणाऱ्यांसह डॉ. शहा यांच्याविरूद्ध एकमेकांच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली.

प्राणवायू संपल्याने गोंधळ –
शहा हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्ण मोठ्या प्रमाणात दाखल आहे. आज हा गोंधळ सुरू असातना रूग्मालायतील एका सिलिंडरमधील प्राणवायू संपल्याने आणखी गोंधळ वाढला. अनेक रूग्णांच्या नातेवाईकांनी गोळा होऊन प्राणवायुची व्यवस्था करण्याची मागणी केली. पोलिसांनाही याबाबत सांगण्यात आले. अखेर पोलिसांनी धावपळ केली व त्यानंतर काही वेळाने सिलिंडर घेऊन वाहन दाखल झाले. तेव्हा कर्मचाऱ्यांना हाताशी घेत प्राणवायु संपलेले सिलिंडर बदलविल्याने संभाव्य अनर्थ टळला. शहा हॉस्पीटलमध्ये तोडफोड होण्याची महिना भरातील ही दुसरी घटना आहे. या रूग्णालायात रूग्णांची प्रचंड आर्थिक लूट होऊनही, प्रशासनाच्या वरदहस्तामुळे हॉस्पीटल व्यवस्थापनाची मुजोरी वाढल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 8:09 pm

Web Title: yavatmal angry mob vandalizes private hospital due to exchange of bodies msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरावं”; मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या डॉक्टरांना आवाहन
2 राज्यातल्या भाजपा नेत्यांना जयंत पाटलांच्या कानपिचक्या; म्हणाले…!
3 संकटात उचलला खारीचा वाटा! महिला बचत गटाने समाजासमोर ठेवला आदर्श
Just Now!
X