करोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अंत्यविधीत २० च्या वर नागरिकांनी सहभागी होऊ नये असा नियम आहे. मात्र, राळेगाव तालुक्यातील जळका येथील सरपंच मारूती सुंदरदास सलामे (वय ४९) यांच्या अंत्यविधीत तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी सहभागी होत या नियमाला तिलांजली दिली. ही बाब प्रशासनाला कळताच खळबळ उडाली. अंत्यविधीदरम्यान अंतरसोवळेही पाळण्यात आले नाही. त्यामुळे करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची भीती व्यक्त होत आहे.

जळकाचे सरपंच मारूती सलामे यांना गुरूवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारांकरीता यवतमाळला नेत असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कळंबनजीक त्यांचे निधन झाले. मारूती सलामे हे सलग दुसऱ्यांदा जळका ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पत्नी शीला सलामे या राळेगाव पंचायत समितीच्या उपसभापती आहेत. राजकीय, सामाजिक उपक्रमांमध्ये ते सतत व्यस्त राहायचे. मारूती सलामे यांच्या अंत्यविधीसाठी जळका येथे आज शुक्रवारी आजुबाजूच्या गावातील नागरिकांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी एकच गर्दी केली. जवळपास तीनशेच्या वर नागरिक यावेळी सर्व नियम धाब्यावर बसवून उपस्थित होते. ही बाब कोणीतरी जिल्हाधिकाऱ्यांना कळविली.

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन तहसीलदार व ठोणदारांना जळका येथे घटनास्थळी पाठविले. तेव्हा पोलिसांना बघून अंत्यविधी अर्धवट सोडून अनेकांनी स्मशानभूमीतून धूम ठोकली. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राळेगावचे तहसीलदार आणि ठाणेदारांना देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

अंत्यविधीसाठी नियम धाब्यावर बसवून उपस्थित राहणाऱ्यांविरोधात ग्राम समितीच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करून कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे राळेगावचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी सांगितले. ग्राम समितीने ३५ जणांची ओळख पटविली असून इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.