News Flash

यवतमाळ : ‘म्युकरमायकोसिस’ग्रस्त रूग्णाचा मृत्यू ; अन्य ११ रूग्ण असल्याने चिंता वाढली!

मागील आठवड्यात म्युकरमायकोसिसग्रस्त सात रुग्णांची नोंद

म्युकरमायकोसिसचे प्रतिकात्मक छायाचित्र

करोनापश्चात भेडसवणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ने यवतमाळमध्येही शिरकाव केला असून, या आजाराने येथे एका ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय आणखी ११ रूग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ने ग्रासले आहे. ‘म्युकरमायकोसिस’ आजाराने शुक्रवारी १४ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय प्रशासनाने आज (सोमवार) त्याबाबत अधिकृत माहिती दिली.

राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे दीड हजारांवर रूग्ण आढळून आले आहेत. यवतमाळमध्येही म्युकरमायकोसिसचे ग्रामीण व शहरी भागात किमान ११ रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. याला महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दुजोरा दिला.

दरम्यान, एका ६० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला असून, अन्य रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एका रूग्णास उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात म्युकरमायकोसिसग्रस्त सात रुग्णांची नोंद झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार रूग्ण आढळले तर खागसी दवखान्यांमध्येही रूग्ण असल्याचे डॉ. भुयार यांनी सांगितले. वणी विभागात झरी तालुक्यातील बोपापूर भागात ६५ वर्षीय पुरूष या आजराने ग्रस्त आहे. त्याला वणी येथे ट्रामा केअर सेंटरमध्ये करोनाचे निदान झाल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृती ठीक झाल्यानंतर ९ मे रोजी सुटी देण्यात आली होती. मात्र घरी गेल्यानंतर त्याला त्रास वाढल्याने १५ मे रोजी त्याला पुन्हा वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला म्युकरमायकोसिस आजाराची सुरुवात असल्याचे निदान झाल्याने यवतमाळ येथे दाखल करण्यात आले.

या आजाराविरूद्ध लढण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये १५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या रूग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण होते. कोविड पश्चात हा आजार अनेक रूग्णांमध्ये बळावत आहे. हा एक प्रकारचा फंगस असून तो पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र करोना उपचारात मधुमेह, स्टेरॉईडचा अतिवापर या कारणांनी रूग्णाची प्रतिकरशक्ती कमी होत असल्याने हा फंगस क्रियाशील होत असल्याचे डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 8:37 pm

Web Title: yavatmal death of a patient with mucormycosis disease msr 87
Next Stories
1 “लसनिर्मिती प्रकल्प कुठेही झाला तर आनंदच”; अजित पवारांनी टोचले भाजपा आमदाराचे कान
2 Tauktae cyclone : मुख्यमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा; परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना!
3 खळबळजनक : कराडजवळ कोयना नदीत पुलाखाली आढळले ग्रेनेड बॉम्ब!
Just Now!
X