मोदींनी ‘चाय पे चर्चा’च्या वेळी दिलेली आश्वासने फोल

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्य़ातील दाभाडी येथील शेतकऱ्यांसोबत ‘चाय पे चर्चा’ करून त्यांना दिलेली आश्वासने मोदी पंतप्रधान झाल्यावरही पूर्ण न झाल्याने याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दाभाडीचे दोनशे शेतकरी १८ मे रोजी दिल्लीला धडकणार असून तेथे जंतर- मंतरवर चोवीस तासांचे आंदोलन करणार आहेत.

२० मार्च २०१४ ला आर्णी तालुक्यातील दाभडी येथे मोदी यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. यावेळी भाजपची केंद्रात सत्ता आल्यास सर्वप्रथम शेतकरी हितार्थ महत्त्वाचे निर्णय घेऊ, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आर्णी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस पक्षाच्यावतीने ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातील आश्वासनाचे काय झाले? हे विचारण्याचा प्रयत्न मोदी यांना केला, पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. आपण दिलेले आश्वासन हे केवळ निवडणूक आश्वासन होते हे तरी मोदींनी एक वेळ स्पष्ट करावे किंवा त्याची पूर्तता तरी करावी, यासाठी १८ मे रोजी दाभडीतील २०० शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन जंतर मंतर येथे २४ तासांचे आंदोलन करणार आहे, असे मोघे यांनी सांगितले. भाजपची सत्ता केंद्रात आल्यावर तीन वर्षांत शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली असून कृषी धोरणात बदल करून शेतकऱ्यांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ आणण्यात मोदी अपयशी ठरले, असा आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आरीजबेग, भारत राठोड, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील भारती व राजेंद्र गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.