जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव आता ग्रामीण भागात झाला आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा २०० पार झाला असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाही नागरिकांना करोनाच्या संकटाचे गांभीर्य नसल्याने प्रशासनाने पुन्हा कठोर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढे शहर व ग्रामीण भागात अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पोलीस विभागास दिले आहेत.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा रडारवर आले आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्णाला बहुतांशवेळी लक्षणे नसतात. पण त्याच्या संपर्कात आलेल्या व ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशा लोकांना या विषाणूचा लवकर संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र तरीसुध्दा वयस्कर नागरिकांसह तरुण-तरुणी, महाविद्यालयीन विद्यार्थी निष्काळजीपणे वागत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून समोर आलंय. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी गुरूवारी सकाळी शहरात फेरफटका मारल्यानंतर अनेकजण अनावश्यकपणे बाहेर फिरताना आढळले. काही ठिकाणी गप्पांचे फड रंगले होते. या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी समज दिली. परंतु, यापुढे कोणीही अशाप्रकारचे विनाकारण बाहेर फिरताना आढळले तर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले.

नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रशासनाला हौस नसते. मात्र निष्काळजीपणे वागणाऱ्या नागरिकांना धडा शिकविण्यासाठी अशी पाऊले उचलावी लागतात, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. सार्वजनिक स्थळांवर थुंकणे, मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न राखणे हे नियम न पाळल्यास संबंधित व्यक्तींवर साथरोग अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदार, फळे, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांनी दोन ग्राहकास २०० रूपये दंड, दुकानमालक, विक्रेता यांना दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक दुकानातील दर्शनी भागात न लावल्यास त्यांनाही दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल. या नियमांचे दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.