शेतातून परत येत असताना चौघे शेतकरी-शेतमजूर नाल्यास आलेल्या पुरात बैलबंडीसह वाहून गेले. ही घटना आज गुरुवारी सायंकाळी वणी तालुक्यातील  डोर्ली येथे घडली. पुरात वाहून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह सापडला तर दुसरी महिला झाडाच्या फांदीत अडकल्याने सुखरुप बचावली आहे. अन्य दोघे जण अद्याप बेपत्ता आहे.

डोर्ली येथील मीना कुडमेथे (३५) मनीषा सिडाम (२३), हरिदास खाडे (५२), विनायक उपरे (५१) हे चौघे जण दोन बैलबंडीने शेतातून घरी परत येत होते. आज परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने गावालगतच्या नाल्यास पूर आला होता. या लोकांसोबत असलेल्या इतर बैलबंडी काही वेळापूर्वीच नाला पार करून पलीकडे गेल्या. मात्र या चौघांच्या बैलबंडी नाला पार करत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ते सर्वजण पुरात अडकले. यात बैलबंडी पाण्यात उलटल्या. यात चौघांसह तीन बैल पुरात वाहून गेले. यात एका बैलाने पाण्याबाहेर उसळी मारल्याने तो सुखरूप राहीला.

ही घटना गावात कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मीना कुडमेथे या महिलेचा  मृतदेह आढळला. तर मनिषा सिडाम ही महिला झाडाच्या फांदीत अडकल्याने बचावली. उर्वरीत दोन पुरुष अद्याप बेपत्ता आहेत. घटनेत तीन बैलांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती समजताच तहसिलदार शाम धनमने, गटविकास अधिकारी राजेश गायनार, ठाणेदार अनिल राऊत यांनी घटनास्थळ गाठले. बेपत्ता असलेल्या हरिदास खाडे व विनायक उपरे यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.