डॉ. कोमल मडावी आदिवासींची सेवा करणार

यवतमाळ : मूलभूत आणि भौतिक सुविधांच्या अभावात वाढलेली गडचिरोली जिल्ह्यातील झिंगानूर गावातील कोमल श्यामला कासा मडावी ही विद्यार्थिनी आदिवासी माडिया समाजातील पहिली महिला डॉक्टर ठरली आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कोमलने नुकतीच एमबीबीएसची पदवी प्राप्त केली असून याच महाविद्यालयात ती सध्या आंतरवासिता वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

झिंगानूर-सिरोंचा-नागपूर ते यवतमाळ या प्रवासाबद्दल ‘लोकसत्ता’शी बोलताना कोमल म्हणाली, झिंगानूरसारख्या अतिदुर्गम गावात वैद्यकीय सुविधांअभावी आदिवासींचे किती हाल होतात हे लहानपणापासूनच बघत आली. झिंगानूरच्या प्राथमिक शाळेत शिकत असताना या जंगलापलीकडे आपले आयुष्य असेल, असे कधीच वाटले नव्हते. आई श्यामला आरोग्यसेविका असल्याने आदिवासींच्या आरोग्याबाबत तिची तळमळ दिसत होती. वडील कासा मडावी हे अल्पशिक्षित शेतकरी आहेत. मात्र या दोघांनाही आम्ही दोन्ही बहिणींनी शिकावे, असे मनापासून वाटत होते. दरम्यान, आईची सिरोंचा येथे बदली झाल्याने चौथीनंतरचे दहावीपर्यंतचे शिक्षण सिरोंचा येथेच झाले. तिथे दुर्गम आदिवासींची वैद्यकीय सेवेअभावी होणारी अडचण आणि आईवडिलांच्या प्ररेणेतूनच वैद्यकीय शिक्षणाची वाट गवसली. वडिलांच्या आग्रहाने नागपूरला होस्टेलमध्ये राहून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पहिल्या प्रयत्नात वैद्यकीय पूर्वपरीक्षेत यश मिळाले नाही. नंतर एक वर्ष घरीच अभ्यास करून दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण करून यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला, असे कोमल म्हणाली.

सिंरोचातून शिक्षणासाठी नागपूर आणि तेथून यवतमाळला वैद्यकीय शिक्षण घ्यायला आल्यानंतर भाषेपासून वेशभूषेपर्यंत अनेक अडचणी आल्यात. मात्र आईवडिलांची प्रेरणा, मित्र-मैत्रिणींची सोबत व येथील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने या अडचणींवर मात केली, असे तिने सांगितले. वैद्यकीय शिक्षण घेत असताना आपण अतिदुर्गम आदिवासी भागातील दुर्लक्षित माडिया समाजातील आहोत, अशी भावना कधीही मनात आली नाही. या समाजातील मी पहिली महिला डॉक्टर आहे, हे तर एमबीबीएसचा निकाल लागल्यानंतर समाज माध्यमांवर उमटलेल्या प्रतिक्रयांमधूनच कळले, असे कोमल म्हणाली. माध्यमांनी दखल घेतल्याने दररोज अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. परंतु, यामुळे आता जबाबदारीही वाढल्याचे तिने सांगितले. आपल्या प्रेरणेतून लहान बहीण पायल हिने सुद्धा वैद्यकीय शाखा निवडली. ती नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षांत शिकत असल्याचे कोमलने सांगितले. कन्ना मडावी हे माडिया जमातीतील पहिले डॉक्टर असल्याचे कळल्यावर अहेरी येथे त्यांची भेट घेतल्याचेही तिने सांगितले. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात आंतरवासिता म्हणून शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर पुढे याच क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन झिंगानूर, सिरोंचा भागात आदिवासी बांधवांना वैद्यकीय सेवा देणार असल्याचे तिने सांगितले. आदिवासींच्या वेदनेवर उपचारांची फुंकर घालण्यासाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण व अनुभवांनी आपण सज्ज झालो, असेही कोमल म्हणाली.