News Flash

यवतमाळ : दारव्हा येथे दोन इंची गणेश मूर्तीची स्थापना

राज्यातील सर्वांत लहान मूर्ती असल्याचा मंडळाकडून करण्यात आला दावा

करोना संसर्गाच्या अनुषंगाने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनेक नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध गणेश मंडळांनी सहकार्याची भूमिका घेत बडेजाव कमी करून, साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. याची प्रचिती दारव्हा येथील ओम गणेशोत्सव मंडळाने चक्क दोन इंच उंचीच्या गणेश मर्तीची स्थापना करून दिली. ही गणेश मूर्ती महाराष्ट्रातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावाही मंडळाने केला आहे.

गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी देखावे न करता चार फुटांपेक्षा लहान गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरातील अंबिका नगरच्या ओम गणेश मंडळाने  केवळ दोन इंच उंची असलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करून अन्य मंडळांसमोर एक  आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

दारव्हा येथील मुर्तीकार शशांक वानखडे यांनी नाममात्र एक रुपयात शाडू मातीची ही सुंदर गणेश मूर्ती साकारली आहे. मूर्तीची पायापासून ते डोक्यापर्यंतची उंची केवळ दोन इंच इतकी आहे. त्यामुळे ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान ‘ या उक्तीचा प्रत्यय या निमित्ताने दारव्हावासियांना येत असून, ही मूर्ती कुतूहलाचा विषय ठरली आहे.  ओम गणेश मंडळाने शेतकरी नामदेव टेकाम यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करत सामाजिक बांधिलकीही जपली. सोबतच करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सॅनिटायझर फवारणी करून गणरायाचे स्वागत केले. या गणेशोत्सव मंडळाने दशकपूर्ती केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांसाठी हे मंडळ चर्चेत असते. यावर्षी दहा दिवस करोना संदर्भात जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 6:59 pm

Web Title: yavatmal installation of a mere two inch ganesh idol at darwha msr 87
Next Stories
1 वर्धा : मेघे अभिमत विद्यापिठाचा यंदाचा गणेशोत्सव कोविड योद्ध्यांना समर्पित
2 सातारा : पोलीस मुख्यालयासह २९ ठाण्यातील पोलिसांना करोनाची लागण
3 राज्यात २४ तासांत आणखी २८८ पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू
Just Now!
X