|| नितीन पखाले

यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणूक

यवतमाळ : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा वाद रंगला आहे. निष्ठावानांवर अन्याय करून पक्षाकडून सातत्याने बाहेरचा उमदेवार लादण्यात येत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या आयात उमदेवारास रोखण्यासाठी रिंगणातील चार अपक्ष उमेदवारांसह अर्ज मागे घेतलेले दोघे, अशा सहा जणांनी एकजूट आघाडी केली  आहे. या अपक्षांची येथील एका हॉटेलात बैठक झाली.

मतदारांना अस्मितेच्या मुद्यावरून एकत्र आणून चार अपक्षांपैकी एकाला मतदान करण्याचे आवाहन करावे, असे बैठकीत ठरले. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने प्रा. तानाजी सावंत यांना उमदेवारी देऊन युतीच्या आधारे निवडून आणले. येथून विजयी झाल्यानंतर सावंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांसोबत कोणताही संबंध ठेवला नव्हता. उमरखेड तालुक्यात गेल्या निवडणुकीतील देण्या- घेण्याच्या व्यवहारावरूनही नाराजी होती. सावंत यांचा निवडणुकीनंतरचा अनुभव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांसाठी वाईट असल्याने शिवसेनेने पोटनिवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होती. त्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार व नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांची नावे पक्षासमोर ठेवण्यात आली. मात्र या नावांवर कोणताही विचार न करता सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेले नागपूरचे दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक पक्षावर आणि स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत.

स्थानिक उमदेवार हाच अस्मितेचा मुद्दा पुढे करून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत तिन्ही पक्षाशी निगडित अपक्षांनी एकजूट केली आहे. त्यात शिवसेना बंडखोर बाळासाहेब मुनगीनवार, काँग्रेसचे शंकर बडे, संजय देरकर आणि दीपक निलावार या अपक्षांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी दुपारी येथील एका हॉटेलात झाली. त्यांना नामांकन अर्ज मागे घेतलेले राजू दुधे, प्रशांत पवार यांचीही सोबत लाभली. महाविकास आघाडी व भाजप या दोन्ही पक्षाचे गर्भश्रीमंत उमदेवार रिंगणात असले तरी घोडेबाजार होऊ  न देण्याचा निश्चय या अपक्षांनी केला आहे. पैशांपेक्षा स्थानिक अस्मितेला महत्त्व द्यावे, अशी विनंती मतदारांना करण्यात येणार असल्याची माहिती बंडखोर बाळासाहेब मुनगीनवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. जिल्ह्यत शिवसेनेचे अन्य नेतृत्व निर्माण होऊ  नये, यासाठी बाहेरचा उमदेवार लादण्याचा चुकीचा पायंडा पक्षात पाडला जात असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही चार अपक्षांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करू आणि निवडणुकीस सामोरे जाऊ, असे ते म्हणाले. ४९० पैकी २५१ मतांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही उमेदवारी कायम ठेवल्याने आम्हाला अनेक आमिष दाखवण्यात येतील, परंतु, आम्ही विकाऊ  नाही, हे सुद्धा दाखवून द्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया मुनगीनवार यांनी दिली.

अपक्षांची उमेदवारी कायम, आठ जणांची माघार

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या ३१ जोनवारीला होऊ  घातलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान कायम आहे. शुक्रवारी नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १५ जणांपैकी आठ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे आता सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाविकास आघाडीतर्फे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांचे बंधू सुमित बाजोरिया यांच्यात मुख्य लढत होईल. याशिवाय शिवसेना बंडखोर श्रीकांत ऊर्फ बाळासाहेब मुनगीनवार यांच्यासह काँग्रेसशी निगडित असलेले शंकर बडे, पूर्वी राष्ट्रवादीत असलेले व सध्या काँग्रेस खासदाराच्या नजीक असलेले संजय देरकर, महाविकास आघाडीशी जवळीक असलेले उद्योजक दीपक निलावार तसेच जावेद परवेज अब्दुल समद यांनीही अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. आज शेख जावेद शेख मुश्ताक, प्रशांत पवार, नंदकिशोर अग्रवाल, म. आरीफ अ. रजाक सुरैया, जगदीश वाधवाणी, अन्सारी जावेद परवेज, राजू दुधे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.