25 February 2021

News Flash

यवतमाळमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक पोलीस पथकाची कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

यवतमाळ शहरात आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पहिल्या घटनेत २६ एप्रिल रोजी यवतमाळच्या सुरज नगर परिसरात तर २९ एप्रिल रोजी शहराच्या पांढरकवडा भागात पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली आहे. या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यवतमाळच्या सुरज नगर भागात राजेश चमेडीया या व्यक्तीच्या घरी सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंबाज सामन्यावर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलीस पथकाला मिळाली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने चमेडीया यांच्या घरावर धाड टाकत; रोख ९० हजार रुपये, दोन मोबाईल, एक लॅपटॉप, एक टीव्ही, सेटअप बॉक्स आणि कॅल्क्युलेटर असा १ लाख ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चमेडीया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे २९ एप्रिलरोजी यवतमाळच्या पांढरकवडा भागात अभिनय उर्फ गुड्डु रॉय या व्यक्तीच्या घरी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत पोलीस पथकाने रॉय याच्या घरावर छापेमारी करत सुनील सुलगेवार, रवी दुम्बा, सागर व्यास या व्यक्तींसह रॉय याचा साथीदार नंदकिशोर बोरेले यांना अटक केली आहे.

या छापेमारीत पोलिसांनी ८ हजार रोख, टेलिव्हीजन सेट आणि सेटऑफ बॉक्स, हॉट लाईन सुटकेस संच, विविध कंपन्यांचे तब्बल १४ मोबाईल, लॅपटॉप, ३ कॅल्क्युलेटर असा १ लाख ९० हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ शहरात आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांवर ताबा ठेवण्यासाठी पोलिसांनी सट्टेबाजांविरोधात विशेष कारवाई मोहीम उघडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 2:38 pm

Web Title: yavatmal police arrested syndicate of bookies in city area seized mobile phone and laptops worth 2 lakh rupees
टॅग IPL 2018
Next Stories
1 चौकीदाराचा खून करून पेट्रोल पंपावर दरोडा
2 पंधरा हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट
3 हवाला प्रकरणात पोलीस कर्मचारी आरोपीच्या पिंजऱ्यात
Just Now!
X