यवतमाळमधील केळापूर तालुक्यातील पाटणबोरी परिसरात मानवी वस्तीत वावर वाढलेल्या ‘टी-टी२सी१’ या नरभक्षक वाघिणीस वन विभागाच्या विशेष बचाव पथकाने आज बुधवारी अखेर अंधारवाडी परिसरात जेरबंद केले. या वाघिणीने गेल्या दोन महिन्यांपासून अंधारवाडी, कोबई ,कोपामांडवी, सुनकडी, वासरी, वाऱ्हा या गावांमध्ये दहशत पसरविली होती. वनविभागाच्या मदतीने अमरावती येथील ‘रॅपीड रेस्क्यू टीम’ने आज (बुधवार) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वाघिणीस बेशुद्ध करून ताब्यात घेतले. यानंतर तिची रवानगी नागपूरच्या गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात करण्यात आली आहे.

आतापर्यंत या वाघिणीने परिसरातील अनेकांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. १९ सप्टेंबरला तालुक्यातील अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई भीमराव दडांजे या महिलेवर हल्ला करून ठार केले होते. त्यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी सुभाष कायतवार हा युवक या वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर झाला होता. तेव्हापासून या वाघिणीस जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार समितीची एक बैठकही पार पडली होती. त्याप्रमाणे पांढरकवडा वन विभागाने पथकांनी पथकं तयार करून वाघिणीचा शोध सुरु केला होता. यासाठी परिसरात २९ कॅमेरे देखील लावण्यात आले होते. वन्यजीव रक्षक डॉ.रमजान विराणी यांनी सादर केलेल्या कॅमेरा फुटेजमध्ये तसेच इतर कॅमेऱ्यात आलेल्या चित्रीकरणात या वाघिणीचा वावर दिसला. ही वाघीण ‘टी-टी२सी१’ असल्याचे लक्षात आले. या सर्व हल्ल्यांमध्ये हीच वाघीण कॅमेरा चित्रीकरणात आढळली.

नागरिकांचा असंतोष बघता अमरावती येथील विशेष पथक चार दिवसांपासून बोरी, अंधारवाडीच्या जंगलात या वाघिणीवर नजर ठेवून होती. या वाघिणीस पकडण्याचा आदेश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी मंगळवारी दिले. त्यानंतर वाघिणीस पकडण्याच्या हालचाली तीव्र झाल्या. आज बुधवारी सकाळी ही वाघीण अंधारवाडी परिसरात जंगलात फिरताना आढळली. वनविभागाच्या पथकाने शिताफिने तिला ‘ट्रँग्यूलाईज’ करून बेशुद्ध केले. ही माहिती परिसरात मिळताच नागरिकांनी वाघिणीला जेरबंद करण्यात आलेल्या ठिकाणाकडे धाव घेतली व जल्लोष केला.
पांढरकवडा वनक्षेत्रातील दहशत माजविणाऱ्या वाघिणीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शिताफीने जिवंत पकडले याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंधित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतूक केले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी आदेश दिल्यापासून ३६ तासांत तिला पकडण्यात आल्यामुळे गावकऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. टिपेश्वर अभयारण्य परिसरातील मानवी वस्तीत वावर वाढलेल्या ‘टी-टी२सी१’ या वाघिणीस सुरक्षितरित्या पिंजराबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले, ही मोठी उपलब्धी असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री संजय राठोड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या कार्यवाहीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: लक्ष ठेवून होते, असे ते म्हणाले. या वाघिणीला प्रथम नागपूर येथील गोरेवाडा प्राणीबचाव केंद्रात स्थानांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करून ती पूर्णत: स्वस्थ व सक्षम असल्यास निसर्गात मुक्त वातावरणात तिला सोडण्यात येईल. वाघिणीला सुरक्षित पकडून केळापूर तालुक्यातील नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल या कार्यवाहित सहभागी वनविभागाचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांचेही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.

मानव-वन्यजीव संघर्षास विराम मिळण्याची अपेक्षा –
टिपेश्वर अभयारण्यानजीकच्या गावांमध्ये मानव, वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन वर्षांपूवी ‘अवनी’ या नरभक्षक वाघिणीच्या दहशतीमुळे हा संघर्ष शिगेला पोहचला. या वाघिणीने परिसरात १३ जणांना ठार केल्याने अखेर या वाघिणीस हैदराबादच्या खासगी शूटरच्या माध्यमातून गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. तेव्हापासून शांत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यालगतच्या परिसरात काही दिवसांपासून ‘टी-टी२सी१’ वाघिणीची दहशत पसरली होती. या वाघिणीसही जेरबंद करण्यात आल्याने आता या परिसरातील मानव-वन्यजीव संघर्षास विराम मिळण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांना आहे.