यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका सध्या करोना हॉटस्पॉट ठरला आहे. मुंबईहून परतलेले अनेकजण तालुक्यात करोना संसर्ग वाहक ठरले आहेत. महागाव येथील एका सराफा व्यावसायिकाचा गेल्या आठवड्यात करोनामुळे मृत्यू झाला. तर त्याची पत्नीही करोना पॉझिटिव्ह आढळली. तालुक्यात करोनाबधितांची संख्या ११ वर गेली आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या किमान ५२ जणांना जिल्हा प्रशासनाने महागाव येथेच उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीकरीता पाठविले आहेत.  या कक्षात असलेले व्यक्ती विरंगुळा म्हणून विविध खेळ खेळतात, मोबाईलवर आपला वेळ घालवितात. तर, येथील चार तरुणांनी विरंगुळा म्हणून केलेले झिंगाट नृत्य समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहे.

हे चौघेही जण ‘डॉन’ चित्रपटातील ‘खईके पान बनारसवाला…’ या गाण्यावर मनसोक्त थिरकले आहेत. या नृत्याने विलगीकरण कक्षात भरती असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील काळजी काही काळ लोप पावली होती, असे निरीक्षण येथील आरोग्य सेवकांनी नोंदविले. या तरूणांच्या नृत्याची चर्चा आणि व्हिडीओ जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्यापर्यंतही पोहचला. करोनाच्या सावटाखाली विलगीकरणातील लोक या पद्धतीने व्यक्त होऊन आनंद घेत असतील तर त्यात वावगे काही नाही. मात्र नियमांचे पालन करावे आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. महागावात दाखल असलेल्यांपैकी अनेकांचे अहवाल निगेटिव्ह येत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र काही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. सोमवारी रात्री यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. महागावातील जनतेने नियमांचे पालन करून प्रशसानास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी  केले.

जेवणाच्या डब्यासोबत दारू आणि खर्रा?
दरम्यान महागावच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्यक्तींना दिले जाणारे जेवण निकृष्ट असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे अनेकजण घरून जेवणाचा डबा मागवायचे. तेव्हा येथे दाखल व्यक्तींना भोजनाच्या डब्यासोबत दारू आणि खर्राही पुरविल्या जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचली. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी सिंह यांनी सोमवारी महागाव येथे भेट दिली. तेथील आरोग्य अधिकारी तसेच दाखल लोकांना धारेवर धरून, दारू, खर्रा असले प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी झटत असताना कोणत्याही सेंटरवर गैरप्रकार होत असतील तर, दोषींची गय केली जाणार नाही, असा दम जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.